राज्यभरात हाताने मैला काढण्याच्या पद्धतीमुळे ८१ कामगार दगावले !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – राज्यभरात हाताने मैला काढण्याच्या पद्धतीमुळे ८१ स्वच्छता कामगार मृत झाले आहेत. सर्वाधिक १२ मृत्यू हे ठाणे जिल्ह्यात झाले असून  त्याखालोखाल मुंबई शहर आणि उपनगरे येथील संख्या आहे. पुणे जिल्ह्यात प्रत्येकी ११; तर पालघर जिल्ह्यात ७, नांदेड जिल्ह्यात ६ आणि संभाजीनगर, नागपूर आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी ५ मृत्यू झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने प्रविष्ट केलेल्या प्रतिज्ञापत्रातून हे वास्तव उघड झाले आहे. ‘सर्वांच्या वारसांना हानीभरपाई दिली आहे’, असे आयुक्तांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले. पुढील सुनावणी १४ ऑगस्ट या दिवशी होणार आहे.

याविषयी कायदा केंद्र सरकारने करूनही ही पद्धत चालू आहे. गटारांमध्ये काम करतांना मृत पावलेल्या स्वच्छता कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याचे प्रावधान असूनही तेही मिळत नाहीत. प्रमाणपत्र द्यावे लागते. एक कर्मचारी खासगी वसाहतीचे काम करतांना गेल्याने पालिका त्याचे दायित्व घेत नाही. या संदर्भात ‘श्रमिक जनता संघा’च्या वतीने याचिका करण्यात आली आहे. याची गंभीर नोंद न्यायालयाने घेतली आहे.