इंदूर (मध्यप्रदेश) – येथील नवनीत गार्डन सभागृहामध्ये २१ जुलै या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक शिष्य डॉ. जयंत आठवले यांचे गुरु, तसेच सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा ‘श्री सदगुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवम् परमार्थिक सेवा ट्रस्ट’कडून भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी सत्यनारायण आणि व्यास पूजा करण्यात आल्यानंतर गुरुपादुकांचे पूजन करण्यात आले. यानंतर भजन करण्यात आले. दुपारी महाप्रसाद ग्रहण करण्यात आला. या वेळी ‘ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, उपाध्यक्ष श्री. भवरास्कर, तसेच डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांच्यासह देशातील विविध भागांतून आलेले भक्त आणि भाविक उपस्थित होते.
२० जुलै या दिवशी येथील भक्तवात्सल्याश्रमातून गुरुपादुकांची पालखी काढण्यात आली. या पालखीत प.पू. अनंतानंद साईश (प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु), प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज (प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी) यांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. दुपारी इंदूरच्या लोकमान्यनगर येथील ‘भजन पर्व’ भजन मंडळाकडून भजनांचा कार्यक्रम आणि नंतर ‘भक्तरस यात्रा’ हा नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर नित्य आरती झाली. संध्याकाळी ७ वाजता प.पू. भक्तराज महाराज स्वरचित प्रासादिक भजनांचा कार्यक्रम श्री. दीपक बिडवई, अधिवक्ता जयंत बोरकर, नाना पडवळ, रवि कुरणे आदी प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांकडून सादर करण्यात आला.