GT World Mall  : बेंगळुरूतील ‘जीटी वर्ल्‍ड मॉल’ला ७ दिवस बंद ठेवण्‍याची शिक्षा !

धोतर नेसलेल्‍या शेतकर्‍याला प्रवेश न देण्‍याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – धोतर, तसेच नेहरू शर्ट परिधान केलेल्‍या एका शेतकर्‍याला प्रवेश नाकारणार्‍या बेंगळुरूच्‍या ‘जीटी वर्ल्‍ड मॉल’वर सरकारने कारवाई केली आहे. मॉलला ७ दिवस बंद ठेवण्‍याची शिक्षा देण्‍यात आली आहे.

राज्‍यात असलेल्‍या हावेरी जिल्‍ह्यातील फकीरप्‍पा नावाचे शेतकरी त्‍यांच्‍या पत्नीसह बेंगळुरूत शिकणार्‍या मुलाला भेटण्‍यासाठी आले होते. ते तिघे येथील मॉलमध्‍ये असलेल्‍या ‘मल्‍टिप्‍लेक्‍स’मध्‍ये चित्रपट पहाण्‍यासाठी आले असता मॉलच्‍या सुरक्षारक्षकाने त्‍यांना प्रवेदद्वारावर रोखले आणि तो त्‍यांना मॉलचे नियम सांगू लागला. सुरक्षारक्षकाने त्‍यांना ‘पँट परिधान करून आल्‍यासच आतमध्‍ये प्रवेश देईन’, असेही म्‍हटले. पिता आणि पुत्र दोघेही सुरक्षा कर्मचार्‍याला वारंवार विनंती करूनही त्‍याने त्‍यांचे ऐकले नाही.

या घटनेचा व्‍हिडिओ कुणीतरी बनवला असून तो सामाजिक माध्‍यमांतून सर्वत्र प्रसारित केला होता. व्‍हिडिओची नोंद घेऊन सरकारने भारतीय न्‍याय संहितेच्‍या कलम १२६(२) (चुकीचा पद्धतीने एखाद्याला प्रतिबंधित करणे) अंतर्गत मॉलचा मालक आणि सुरक्षारक्षक यांच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंदवला आणि मॉल ७ दिवस बंद ठेवण्‍याचा आदेश दिला आहे. ही घटना १६ जुलैची असून १८ जुलैला यासंदर्भात मॉलच्‍या विरोधात कारवाई करण्‍यात आली.