Madras High Court  Muharram :  मोहरमच्या मिरवणुकीत ढोल वाजवण्याला मद्रास उच्च न्यायालयाकडून अनुमती !

पारंपरिक पद्धतीने मोहरम साजरा करण्याला विरोध करणार्‍या ‘तौहीद जमात’ संघटनेला न्यायालयाने फटकारले !

चेन्नई (तामिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने राज्यातील तिरुनेलवेली जिल्ह्यात असलेल्या इरावड्डी शहरातील एका प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला. १६ जुलैला दिलेल्या या निकालानुसार, १७ जुलैच्या मोहरमच्या कार्यक्रमात ढोल, संगीत आणि कुथिराई पंच (रथयात्रा) यांचा समावेश करण्याची अनुमती देण्यात आली.  मोहरमच्या कार्यक्रमात ढोल, संगीत आदींचा समावेश करण्याला ‘तौहीद जमात’ या संघटनेने विरोध केला होता. या संघटनेच्या विरोधात मुसलमानांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तेव्हा न्यायालयाने वरील निकाल दिला.

न्यायालयाने म्हटले की, पांरपरिकपणे उत्सव साजरा करण्यावर आक्षेप घेणार्‍या कट्टरतावादी मुसलमानांनी घरीच बसावे. मूलतत्त्ववादी शक्तींपेक्षा मूलभूत अधिकारांना प्राधान्य द्यायला हवे, असेही न्यायालयाने या वेळी नमूद केले.

न्यायमूर्ती जी.आर्. स्वामीनाथन् यांनी सुनावणीच्या वेळी म्हटले की,

१. राज्यघटनेच्या कलम १९ (१) (बी) आणि (डी) नुसार धार्मिक मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ‘तौहीद जमात’ या संघटनेला ‘मुसलमान समाजातील अन्य लोकांनी कसे वागावे ? अथवा सण कसा साजरा करावा ?’, हे सांगण्याचा अधिकार नाही.

२. कट्टरतावादी तत्त्वांनी दिलेल्या धमक्यांना जिल्हा प्रशासन बळी पडणे दुर्दैवी आहे. जर एखाद्याचे मूलभूत अधिकार धोक्यात आले असतील, तर ते अधिकार राखणे आणि अधिकारांच्या वापरात अडथळा आणणार्‍यांना दंडित करणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.

३. मूलतत्त्ववादी शक्तींपेक्षा मूलभूत अधिकारांना प्राधान्य दिले पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्थेचे सूत्र सांगून अधिकारांचा वापर रोखण्याचा सोपा अन् आळशी पर्याय जिल्हा प्रशासनाने स्वीकारला, तर त्यातून त्यांची नपुंसकता दिसून येते. (सर्वत्रच्या हिंदुविरोधी प्रशासनाला ही चपराकच आहे ! – संपादक)

४. स्थळानुसार भाषा पालटते, तशा प्रथाही पालटतात.

५. जर इरवाडी लोकांचा संगीत, ढोलताशांच्या तालावर आणि रथ मिरवणुकीवर विश्‍वास असेल, तर त्यांच्याकडून सौदी अरेबियाच्या वागणुकीशी जुळवून घेण्याच्या अपेक्षा करणे, ही तालिबानी पद्धत नव्हे का ?


काय आहे प्रकरण ?

तिरुनेलवेली जिल्ह्यातील एरवाडी शहरात मुसलमान लोकांचा एक वर्ग वर्षानुवर्षे ढोल-ताशांच्या गजरात मोहरमची मिरवणूक पारंपरिकपणे काढतो. याला ‘संथानाकुडू मिरवणूक’ अथवा ‘कुथिरई पंच’ असे संबोधले जाते; परंतु यंदा त्यांना ‘तौहीद जमात’ या संघटनेने विरोध केला. स्थानिक प्रशासनही ‘तौहीद जमात’च्या विरोधाला बळी पडले. या विरोधात स्थानिक मुसलमानांनी उच्च न्यायालय गाठले. त्यावर न्यायालयाने तौहीद जमात, तसेच प्रशासन यांना फैलावर घेतले आणि स्थानिक मुसलमानांना पारंपरिक पद्धतीने मोहरम साजरा करण्याची अनुमती दिली.

संपादकीय भूमिका

शाळांमध्ये हिजाबच्या वापराला विरोध करणार्‍या हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवणारे आता आता ‘तौहीद जमात’च्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !