UP Moharram Procession : (म्हणे) ‘उत्तरप्रदेश सरकार मोहरमच्या मिरवणुकांवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे !’ – खासदार झियाउर रहमान बर्क

समाजवादी पक्षाचे संभलचे खासदार झियाउर रहमान बर्क यांचा आरोप

समाजवादी पक्षाचे संभलचे खासदार झियाउर रहमान बर्क

संभल (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहरमच्या मिरवणुका शांततेत आयोजित करण्याविषयी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत.  मिरवणुकीसाठी विजेच्या तारा, तसेच झाडे तोडणे यांवर बंदी घालण्यात आली आहे. ताजियाच्या (इमाम हुसेन यांच्या समाधीची प्रतिकृती. ती अनेक प्रकारात आणि आकारात बनवली जाते) उंचीविषयीही आदेश देण्यात आला आहे. आता या प्रकरणावर समाजवादी पक्षाचे संभलचे खासदार झियाउर रहमान बर्क यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोहरमच्या मिरवणुकांवर बंदी घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

ताजियाची उंची न्यून करण्याचा आदेश चुकीचा !

खासदार झियाउर रहमान बर्क यांनी १४ जुलैच्या रात्री त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारने ताजियाची उंची न्यून करण्याचा आदेश दिला आहे, हे योग्य नाही. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनी शासनाच्या आदेशाची प्रत लोकप्रतिनिधींना द्यायला हवी होती. पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांनी मोहरम कमिटी, तसेच मुसलमान समाजातील उत्तरदायी व्यक्ती यांच्यासमवेत समन्वय बैठक घेऊन मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला नाही.

खासदार बर्क यांनी आरोप केला की, काही पोलीस आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी मुसलमान समाजातील लोकांच्या बलपूर्वक स्वाक्षर्‍या करून घेतल्या गेल्या. ते स्वतःच्या इच्छेनुसार ताजियाची उंची न्यून करत असल्याचे यात लिहिले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे.

  • (म्हणे) ‘मोहरमच्या मिरवणुकांवर निर्बंध आणले, तर कावड यात्रा, रामलीला आणि गुरु नानक जयंतीही बंद पाडू !’

  • ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्याचे फुत्कार !

‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’कडूनही ताजियावरून उत्तरप्रदेश सरकारवर टीका करण्यात येत आहे. बोर्डाचे सदस्य महंमद कमाल फारुकी यांनी ‘मोहरमच्या मिरवणुकांवर सरकार निर्बंध लादत आहे. मोहरमवर निर्बंध लादले, तर कावड यात्राही बंद पाडू. रामलीला आणि गुरु नानक जयंतीही बंद पाडू’, अशा शब्दांत सरकारला धमकी दिली.

संपादकीय भूमिका

  • अशी धमकी देणारी व्यक्ती आतापर्यंत कारागृहात असायला हवी होती ! उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक आहे !
  • ‘मोहरम बंद पाडू’, अशी कुणी धमकी दिली असती, तर एव्हाना देशात आगडोंब उसळला असता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘भारत मुसलमानांसाठी असुरक्षित आहे’, अशी टीका झाली असती; मात्र हिंदूंच्या धार्मिक सणांविषयी विधाने करूनही सर्व काही शांत आहे. हिंदूंनी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी वैध मार्गाने कृती करणे आवश्यक आहे !