मुंबई, १४ जुलै (वार्ता.) – काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या १९ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या ८ आमदारांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची ८ मते फुटल्याचे दिसून आले.
फुटलेल्या आमदारांविषयी बोलतांना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले की, महाराष्ट्रातील जनता आमच्या समवेत आहे; पण पक्षातील गद्दार आम्हाला शोधून काढायचे होते म्हणूनच काँग्रेसने विधानपरिषद निवडणूक लढवली होती. आता पक्षातील कचरा साफ होईल.