Constitution Assassination Day :  आणीबाणीत अत्याचार सहन करणारे आज अत्याचार करणार्‍यांना पाठीशी घालत आहेत ! – भाजप

२५ जूनला ‘राज्यघटना हत्या दिन’ घोषित केल्यावरून रणकंदन !

नवी देहली – आणीबाणीच्या निषेधार्ध केंद्र सरकारने २५ जून हा ‘राज्यघटना हत्या दिन’ म्हणून पाळण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. ज्यांनी अत्याचार सहन केले, ते आज अत्याचार करणार्‍यांच्या पाठीशी आहेत, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केले आहे. त्रिवेदी यांनी आरोप केला की, केवळ वर्ष १९७५ मध्येच नव्हे, तर काँग्रेसच्या सर्व राजवटींत राज्यघटनेची हत्या करण्यात आली. जवाहरलाल नेहरू यांनी वर्ष १९५१ मध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी राज्यघटनेत पहिली दुरुस्ती केली होती. तोपर्यंत देशात निवडणुकाही झाल्या नव्हत्या.

अमित शहा आणि दिवंगत इंदिरा गांधी

२५ जून १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी देशात तडकाफडकी आणीबाणी घोषित करून देशाची सर्व सूत्रे स्वत:च्या हाती घेतली होती. ही घटना आता ५० व्या वर्षात पदार्पण करत असल्याने केंद्रशासनाने ही घोषणा केली होती. त्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याला उत्तर देतांना त्रिवेदी यांनी वरील वक्तव्य केले.

काय म्हणाले विरोधी पक्षांचे नेते ?

१. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत : आणीबाणीला ५० वर्षे झाली; पण भारतीय जनता पक्ष भविष्याऐवजी भूतकाळाकडे पहात आहे. वर्ष १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली होती; कारण तेव्हा देशात अराजकता होती. जर अटलबिहारी वाजपेयी यांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले असते, तर त्यांनीही आणीबाणी लागू केली असती.

२. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा : सरकारचे असे पाऊल राज्यघटनेची छेडछाड करण्याचा प्रयत्न आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या धक्क्यातून सावरण्याचा हा प्रयत्न आहे. सत्ताधारी भाजप दुटप्पीपणा करत आहे. भाजपने आरशात पाहिले पाहिजे. राजकीय प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा गैरवापर केल्यावरून आणि देशातील मानवाधिकार कार्यकर्त्यांना त्रास दिल्यावरून भाजपने देशाची क्षमा मागितली पाहिजे.