नीती आयोगाच्या ‘शाश्वत विकास लक्ष्य क्रमवारी’त गोवा देशात तिसर्‍या स्थानी

पणजी, १३ जुलै (वार्ता.) – नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वर्ष २०२३-२४ साठीच्या ‘शाश्वत विकास लक्ष्य (एस्.जी.डी.) क्रमवारी’त गोव्याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. विविध निकषांवर उत्तम कामगिरी करत गोव्याने एकूण ७७ गुणांची कमाई केली आहे. या क्रमवारीत केरळ आणि उत्तराखंड ७९ गुणांसह संयुक्तरित्या पहिल्या स्थानी आहे, तर ७८ गुणांसह तमिळनाडू दुसर्‍या स्थानी आहे. या सूचीत बिहार सर्वांत शेवटच्या स्थानी आहे. ‘एस्.जी.डी.’ची राष्ट्रीय सरासरी ७१ गुण इतकी आहे.

नीती आयोगाच्या वतीने वर्ष २०१८ पासून देशात, तसेच सर्व राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत झालेल्या विकासाचे मूल्यांकन केले जाते. यासाठी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, मूलभूत सोयी, गरिबी निर्मूलन आदी ‘एस्.जी.डी.’च्या ११३ निकषांवरून प्रगतीचे मोजमाप केले जाते. यानंतर एकूण विविध १६ क्षेत्रांत झालेल्या प्रगतीच्या आधारावर ‘एस्.जी.डी.’ क्रमवारी घोषित केली जाते. या १६ क्षेत्रांमध्ये शून्य ते १०० असे गुण दिले जातात. यंदा आयोगाने गोव्याला ‘फ्रंटरनर’ (आघाडीवर असलेला) या श्रेणीत स्थान दिले आहे. गोव्याने स्वच्छ पाणीपुरवठा आणि स्वच्छता या श्रेणींमध्ये १०० टक्के गुण मिळवले आहेत, तसेच वीज आणि पाणीपुरवठा या श्रेणीतही गोव्याला अन्य राज्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, शाश्वत पायाभूत सुविधा, प्लास्टिक कचरा निर्मिती, अन्नाची नासाडी आदी श्रेणींमध्ये गोवा अल्प पडला आहे.

पहिल्या स्थानी येण्याचा प्रयत्न करू ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावर भाष्य करतांना म्हणाले,‘‘एस्.जी.डी.’ क्रमवारीत गोवा राज्य देशात तिसर्‍या स्थानी पोचला असल्याने गोवा सरकारने केलेल्या प्रयत्नांना फळ मिळाले आहे. आम्ही गोव्याला पहिल्या स्थानी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’ (केवळ सत्ताधार्‍यांनी नाही, तर नागरिकांनीही कचरा व्यवस्थापन, इंधनाचा वापर, प्लास्टिक कचरा निर्मिती, अन्नाची नासाडी आदी गोष्टी अल्प करायला हव्यात. यासाठी सरकारने नागरिकांवर तसे संस्कार करायला हवेत ! – संपादक)