गौण खनिज वाहतुकीच्या बनावट वाहतूक ओळखपत्राच्या प्रकरणी आस्थापनाविरुद्ध कारवाई केली ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

विधानसभा लक्षवेधी सूचना

श्री. श्री. राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविषयी ‘सिस्टिम इंटेग्रेटर’ म्हणून मे. शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रा. लि. आस्थापनाची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र आस्थापनाकडून गौण खनिज वाहतुकीचे दुय्यम बनावट वाहतूक पास (ओळखपत्र) प्रकरणी तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे नोंद केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे त्रयस्थ पद्धतीने पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आस्थापनाविरुद्ध शासनस्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १२ जुलै या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. या संदर्भात सदस्य जयकुमार गोरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यातील वाळू आणि इतर गौण खनिजाच्या अवैध उत्खनन अन् वाहतूक यासंबंधी प्रक्रियेचे संगणकीकृत सनियंत्रणाच्या अनुषंगाने निविदा प्रक्रियेतून मे. शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रा.लि. आस्थापनाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या आस्थापनाने महाखनिज संगणकप्रणाली विकसित केली आहे. या आस्थापनाला शासनाने दिलेले कंत्राट रहित करण्यात आले आहे. त्याविरुद्ध आस्थापन न्यायालयात गेले आहे. आस्थापनाने आतापर्यंत केलेल्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीअंती आस्थापनाला काळ्या सूचीत टाकण्यात येईल, तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कंत्राट रहित झाल्यामुळे गौण खनिजाच्या संदर्भातील माहिती शासनाला देणे आस्थापनाला बंधनकारक आहे. ही संपूर्ण माहिती घेण्यात येईल. आवश्यकता पडल्यास या प्रकरणात दोषी असलेल्यांविरुद्ध फौजदारी गुन्हेही नोंद करण्यात येतील.

संपादकीय भूमिका :

एखादे आस्थापन शासनाला फसवण्याचे धैर्य करते, याचाच अर्थ कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक कुणालाच उरलेला नाही !