पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा) २३.३.२०२४ ते ५.४.२०२४ या कालावधीत देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होते. त्या वेळी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. शंकर राजाराम नरुटे (पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा मुलगा, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. स्वावलंबी जीवन
पू. आबांचे वय ९१ वर्षांचे आहे. वयोमानामुळे त्यांना काही गोष्टी करायला जमत नाहीत. तरीही ते त्या करण्याचा प्रयत्न करतात, उदा. स्वतःचे कपडे स्वतः घालणे. त्यांना फारसे चालायला होत नाही; पण ‘चालले नाही, तर झोपून रहावे लागेल आणि इतरांना त्यांची सेवा करावी लागेल’; म्हणून ते प्रयत्नपूर्वक चालतात. त्यांना ‘विश्रांती घ्या’, असे म्हटले, तर ‘शरिराला व्यायाम हवा. त्याने आयुष्य वाढते. शरीर अधिक कार्यरत रहाते’, असे ते सांगतात. त्यांची शारीरिक क्षमता न्यून झाली असली, तरी इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे ते सतत कार्यरत रहाण्याचा प्रयत्न करतात.
२. भगवंताशी अनुसंधान असणे
पू. आबांना ‘‘तुम्ही कोणता नामजप करता?’’ असे विचारले तर, ‘‘सुरू आहे’’, एवढेच ते सांगतात. ते नामजप करतात, हे स्थुलातून लक्षात येत नाही; पण ‘त्यांचा आतून जप चालू असतो’, असे वाटते. या संदर्भात मी एकदा सद्गुरु मुकुल गाडगीळ यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘त्यांचे अनुसंधान हाच त्यांचा नामजप आहे.’’ त्यांचे आतून भगवंताशी अनुसंधान असते. भगवंताच्या विशिष्ट अशा कोणत्या रूपावर नाही; पण ‘भगवंतावर त्यांची निष्ठा आहे’, असे वाटते.
३. संत झाल्यानंतर लक्षात आलेली सूत्रे
३ अ. मन निर्विचार होणे आणि स्वभाव शांत होणे : पूर्वी त्यांचा विचार करण्याचा भाग अधिक होता. आता त्यांचे मन निर्विचार असते. त्यांचे बोलण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. पूर्वी त्यांचा स्वभाव रागीट होता. आता तो शांत झाला आहे. काहीही घडले, तरी त्यांच्या मनावर काहीच परिणाम होत नाही.
३ आ. साक्षीभाव : चार वर्षांपूर्वी माझी आई ((कै.) सौ. शालन राजाराम नरुटे) हिचे निधन झाले. त्या वेळीही ते स्थिर राहिले. तेव्हा त्यांनी त्या प्रसंगाकडे साक्षीभावाने पाहिले.’
– श्री. शंकर राजाराम नरूटे (पू. आबांचा मुलगा), (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.५.२०२४)