World Heritage Committee : जागतिक वारसा समितीची भारतात प्रथमच होणार बैठक !

भारत अध्यक्षपद भूषवणार !

नवी देहली – आतापर्यंत भारतातील ४२ ऐतिहासिक स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा मिळाला असून लवकरच आणखी काही स्थळांचा या सूचीत समावेश होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात २१ जुलै या दिवशी देहलीत ‘युनेस्को जागतिक वारसा समिती’ची बैठक होणार असून भारतात ही बैठक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यातही यंदा भारत या समितीचे अध्यक्षपद भूषवणार आहे. २१ ते ३१ जुलै या कालावधीत चालणार्‍या या बैठकीत १९५ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

‘युनेस्को’च्या जागतिक वारसा समितीचे यंदाचे ४६ वे सत्र असणार आहे. जगातील सांस्कृतिक आणि दुर्मिळ वारसा यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘युनेस्को’च्या या समितीत २१ देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. भारताला चौथ्यांदा या समितीचा भाग बनण्याची संधी मिळाली असून सदस्यात्वाचा कार्यकाळ ४ वर्षांचा (२०२१ ते २०२५) आहे. यासह भारत या समितीचा अध्यक्षही आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी यासंदर्भात माहिती दिली.

जागतिक वारसा समितीच्या बैठकीचे महत्त्व !

जागतिक वारसा समिती ही जागतिक वारसा स्थळांची नोंद ठेवते. त्या सर्व स्थळांचा सांभाळ (देखभाल) योग्य प्रकारे होत आहे ना ?, याचा लेखाजोखाही या समितीकडून ठेवला जातो. जागतिक वारसा समितीच्या बैठकीत सर्व देशांकडून त्यांच्या-त्यांच्या देशातील वास्तूंचा वारसा स्थळांच्या सूचीत समावेश करण्याच्या प्रस्तावांवर चर्चा आणि मूल्यमापन केले जाते. जी स्थळे बैठकीत अंतिम म्हणून घोषित होतात, त्यांचे नाव ‘युनेस्को’कडून ‘जागतिक वारसा सूचीत’ समाविष्ट केले जाते.