६ जुलै २०२४ या दिवशी ‘एका यंत्रमानवाने (‘रोबोट’ने) कामाचा ताण सहन न झाल्याने स्वतःला संपवले’, अशी बातमी वाचनात आली. यामुळे संशोधक आणि शास्त्रज्ञ मंडळी चिंताग्रस्त झाली आहेत. अनेकदा आपण एस्.टी. चालक, वाहनचालक यांना गाडीला नमस्कार करून गाडीत बसतांना पाहिले असेल. गाडीला हार घालणे, गाडी धुऊन तिची पूजा करणे या प्रकारांची अनेक आधुनिक वैज्ञानिक विचारांची मंडळी खिल्ली उडवतात. गाडीची पूजा करणार्यांचा भाव काय असतो ? तर ते यंत्रालाही आपल्याप्रमाणे सजीव आणि स्वतःचा सहकारी सदस्य मानतात; त्याला भावना आहेत, असे समजतात आणि त्याच भावनेने त्या यंत्राशी संवाद साधतात.
नावाडी लोक हे समुद्र आणि नदी यांच्याशी बोलतात, संवाद साधतात अन् समुद्र वा नदी यांना ‘आम्हाला सांभाळून ने’, असे सांगतात. पूर्वी एखादा माणूस प्रवासाला एकटा निघाला की, खिशात देवाच्या नावाने खडा स्वतःजवळ ठेवत असे. त्याचा अर्थ मी एकटा नाही, आपल्या समवेत देव आहे. एखाद्या निर्जीव वस्तूला स्वतःचा चुकून पाय लागला, तर आपण नमस्कार करतो. आपल्याकडे निर्जीवांशीही संवाद साधला जातो, ही आपली हिंदु संस्कृती आहे. आपले पूर्वज वेडे होते का ? कधीतरी विचार करा.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी, म्हणजेच माऊलींनी निर्जीव भिंत चालवली, तीही अशाच संवादाने ! त्यांना काही ‘टुरिस्ट कंपनी’ (यात्रा आस्थापन) काढायची नव्हती आणि पुढील आयुष्यात त्या भिंतीचा वाहनाप्रमाणे वापर करायचा नव्हता. त्यांना केवळ चांगदेवांना एवढेच दाखवयाचे होते की, तुमची सजीवांवर सत्ता चालते, माझी निर्जीवावरही आहे.’
आपणही प्रयत्न करून बघा आणि संवाद साधा !
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. (६.७.२०२४)