Russia Ukraine War : रशियाचे युक्रेनच्‍या रुग्‍णालयावर हवाई आक्रमण : ४१ ठार, १७० जण घायाळ !

१०० हून अधिक इमारतींची हानी

घटनास्थळ

कीव्‍ह (युक्रेन) – रशियाने युक्रेनची राजधानी कीव्‍ह येथील एका बालरुग्‍णालयावर हवाई आक्रमण केल्‍याचा दावा केला गेला आहे. त्‍यात ४१ जण ठार, तर १७० हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. ‘सी.एन्.एन्.’नुसार ८ जुलैला हे आक्रमण झाले. यानंतर ६०० हून अधिक रुग्‍णांना रुग्‍णालयातून दुसरीकडे हालवण्‍यात आले. हे आक्रमण इतके मोठे होते की, जवळपासच्‍या १०० हून अधिक इमारतींची हानी झाली.

आक्रमणानंतर काही वेळातच रुग्‍णालयाची इमारत कोसळली. युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष वोलोदिमिर झेलेंस्‍की यांनी सांगितले की, रुग्‍णालयात गर्दी असल्‍याने हे आक्रमण करण्‍यात आले. या आक्रमणाचा सूड घेण्‍यासाठी त्‍यांनी तातडीची एक सैन्‍य बैठक बोलावली. संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेनेही एका विशेष बैठकीचे आयोजन केल्‍याचे समजते.

युक्रेनच्‍या हवाई दलाने सांगितले की, त्‍याने ३८ पैकी ३० रशियन क्षेपणास्‍त्रे पाडली आहेत. हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे आक्रमण होते.