PM Modi Russia Visit : पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण आयुष्‍य भारताच्‍या लोकांसाठी समर्पित केले ! – रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन

रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करताना

मॉस्‍को – पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्‍ट्रिया या देशांच्‍या तीन दिवसांच्‍या दौर्‍यावर आहेत. ८ जुलै या दिवशी ते मॉस्‍को येथे पोचले असता तेथे त्‍यांचे भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांतुरोव यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्‍वागत केले. ८ जुलैला रात्री पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. भारताच्‍या विकासात पंतप्रधान मोदी यांच्‍या योगदानाचे पुतिन यांनी कौतुक केले. राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही तुमचे जीवन भारतातील लोकांसाठी समर्पित केले. तुमच्‍याकडे तुमच्‍या स्‍वतःच्‍या कल्‍पना आहेत. तुम्‍ही एक उत्‍साही व्‍यक्‍ती आहात. तुम्‍ही नेहमीच भारत आणि भारतीय यांच्‍या हिताचे परिणाम साध्‍य करू शकाल. त्‍याचे परिणाम दिसून येत आहेत. भारत आता जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्‍यवस्‍था आहे.’’ त्‍याला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्‍हणाले, ‘‘भारतातील जनतेने मला मातृभूमीची सेवा करण्‍याची आणखी एक संधी दिली आहे. माझे एकच ध्‍येय आहे, या लोकांची आणि देशाची सेवा करणे.’’

दोन्‍ही जागतिक नेत्‍यांनी राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या निवासस्‍थानी चहापानाच्‍या वेळी  अनौपचारिक चर्चा केली. यामुळे दोन्‍ही देशांमधील संबंध आणखी दृढ होतील. रशिया-युक्रेन युद्ध चालू असतांना पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच रशिया दौरा आहे.