‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे ‘ऑनलाईन’ अर्ज भरतांना शुल्क आकारणार्‍या २ ‘नेट कॅफे’ चालकांच्या विरोधात गुन्हा नोंद !

सोलापूर, ८ जुलै (वार्ता.) – राज्यशासन ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात सर्वत्र राबवत आहे. या योजनेसाठी अर्ज भरतांना येथील सात रस्ता परिसरातील दोन ‘नेट कॅफे’ चालकांनी लाभार्थी महिलांकडून १०० रुपये आणि २०० रुपये शुल्क आकारल्याच्या प्रकरणी संबंधित नेट कॅफे चालकांविरुद्ध ६ जुलै या दिवशी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. जिल्ह्यातील कोणत्याही ‘महा-ई-सेवाकेंद्रा’वर किंवा नेट कॅफेवर या योजनेचे अर्ज भरण्यासाठी संबंधित महिला लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना १ सहस्र ५०० रुपये शासन देणार असून यासाठी प्रतिवर्षी ४६ सहस्र कोटी रुपयांचे प्रावधान राज्यशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरत असतांना ‘महा-ई-सेवा केंद्र’ अथवा ‘नेट कॅफे यांनी कोणतेही शुल्क न आकारता विनामूल्य अर्ज भरून महिला लाभार्थ्यांना सहकार्य करण्याविषयी शासन निर्णय निर्देशित केलेला आहे. शासन संबंधित सेवाकेंद्राला प्रतिअर्ज ५० रुपये शुल्क देणार आहे.