पुणे शहरातील १६५ ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित !

पुणे पोलीस

पुणे – शहरातील १६५ ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित आहेत. पुणे पोलिसांनी महिला सुरक्षेच्या अनुषंगाने संवेदनशील असलेले हे ‘हॉटस्पॉट’ (संवेदनशील ठिकाणे) शोधून काढले आहेत. यामध्ये सर्वाधिक ठिकाणे ही शिवाजीनगर, पर्वती, बिबवेवाडी, हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्यांच्या परिसरातील आहेत. ‘महिला सुरक्षा समिती’च्या वतीने या ठिकाणांवर उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही चालू आहे.

राज्यशासनाने महिलांच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व पोलीसदलांना वर्ष २०१५ मध्ये ‘महिला सुरक्षा समिती’ स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ‘महिला सुरक्षा समिती’ स्थापन करण्यात आली होती. कालांतराने समितीचे काम बंद पडले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहराचा पदभार स्वीकारल्यानंतर या समितीच्या कामाकडे लक्ष दिले. या समितीच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला असून पोलीस आयुक्तांकडून आवश्यक त्या सूचनाही करण्यात येत आहेत. पोलीसदलाकडून ‘दामिनी पथक’, ‘भरोसा पथक’ यांच्याकडून ‘हॉटस्पॉट’वर लक्ष ठेवण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • पुणे येथे १६५ ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित असणे हे ‘संस्कृतीचे माहेरघर’ नष्ट झाल्याचेच लक्षण !

  • ‘स्मार्ट सिटी’ होण्यासाठी प्रयत्नरत असणारे पुणे पोलीस महिलांसाठी असुरक्षित असणे संतापजनक आणि प्रशासनाला लज्जास्पद !

  • पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येच महिला असुरक्षित आहेत, यावरून महिलांना कधीतरी पोलिसांचा आधार वाटेल का ? आणि महिला कधीतरी सुरक्षित होतील का ?