प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या चैतन्यमय गाडीच्या संदर्भात साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि त्याने रेखाटलेली भावचित्रे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त…

प.पू. भक्तराज महाराज

‘भजन, भ्रमण आणि भंडारा’, ही प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या साधनेची त्रिसूत्री होती. प.पू. बाबा त्यांच्या भारतभरातील भक्तांना भेटण्यासाठी आणि त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी भ्रमण करत असत. त्यांनी अनेक वर्षे भ्रमणासाठी वापरलेली चैतन्यमय चारचाकी गाडी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात जतन करून ठेवण्यात आली आहे. साधक या गाडीसमोर बसून नामजप करतात, तसेच तिला भावपूर्ण प्रदक्षिणाही घालतात. या साधकांना ‘आध्यात्मिक स्तरावर उपाय होणे, ध्यान लागणे, नामजप चांगला होणे’ इत्यादी अनुभूती येतात.

प.पू. बाबांनी वापरलेल्या गाडीला प्रदक्षिणा घालत असतांना आणि गाडीसमोर बसून नामजप करत असतांना साधकाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. या अनुभूती येत असतांना साधकाकडून त्या त्या प्रसंगानुसार भावचित्रेही रेखाटली गेली.

प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेली चैतन्यमय गाडी

१. गाडीला प्रदक्षिणा घालत असतांना आलेल्या अनुभूती

श्री. अमित हावळ

१ अ. साधकाला श्रीकृष्णाने पाठीवर अभयहस्त ठेवल्याचे दृश्य दिसणे आणि त्याची भावजागृती होणे : ‘४.३.२०२४ या दिवशी गाडीला प्रदक्षिणा घालत असतांना माझ्या मनात पुढील विचार आले, ‘माझा पाठीराखा जगद्गुरु श्रीकृष्ण आहे. माझी आणि माझ्या कुटुंबियांची काळजी घेणारा अन् त्यांचा योगक्षेम वहाणारा श्रीकृष्ण आहे.’ त्यानंतर ‘तू भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे’, असे प्रेमाने सांगत श्रीकृष्णाने माझ्या खांद्यावर पाठीमागून हात ठेवला आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. त्यामुळे मी निश्चिंत झालो आणि माझा भाव जागृत झाला.

१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पुढे चालत असून ते साधकाला साधनेत पुढे घेऊन जात असल्याचे दृश्य दिसणे : त्यानंतर मला पुढील दृश्य दिसले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्या पुढे चालत आहेत आणि माझ्या साधनेत येणारे अडथळे दूर करत आहेत. ते मला मार्गदर्शन करत साधनेत पुढे पुढे घेऊन जात आहेत.’

२. गाडीसमोर बसून नामजप करत असतांना आलेल्या अनुभूती

२ अ. नामजप करत असतांना मला जाणवले, ‘प.पू. बाबांची गाडी, म्हणजे साक्षात् शेषनाग आहे आणि त्यावर श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर पहुडले आहेत.’

२ आ. झाडाजवळ एक खारूताई दिसल्यावर रामसेतू बांधण्यासाठी खारूताईने केलेल्या साहाय्याचा प्रसंग आठवून भावजागृती होणे : मला तेथील झाडाजवळ एक खारूताई दिसली. तिच्याकडे पहाताच मला रामायणातील पुढील प्रसंगाची आठवण झाली, ‘वानरसेना आपापल्या क्षमतेप्रमाणे तन आणि मन अर्पून रामनाम घेत रामसेतू बांधत होती. तेव्हा खारूताईनेही छोटे छोटे खडे वेचून रामसेतू बांधण्यासाठी वानरसेनेला साहाय्य केले. हे पाहून प्रभु श्रीरामचंद्राने खारूताईला प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले.’ तो प्रसंग आठवून माझी भावजागृती झाली.

या वेळी मला ‘भावपूर्ण नामजप कसा करायचा आणि नामाला आध्यात्मिक भावाची जोड कशी द्यायची ?’, हे शिकायला मिळाले’, याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

‘हे गुरुदेवा, ‘मला सतत भावस्थितीत रहाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. अमित अशोक हावळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.३.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक