मुंबई, ५ जुलै (वार्ता.) – विधान परिषदेच्या ११ जागांसाठी घोषित झालेली निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. अर्ज प्रविष्ट केलेल्या मुख्य उमेदवारांपैकी एकानेही माघार न घेतल्यामुळे १२ जुलै या दिवशी ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण १२ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी एकूण १४ अर्ज प्रविष्ट झाले होते. पैकी अरुण जगताप आणि अजय सिंह सेंगर या अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले. ५ जुलै या दिवशी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक होता. उर्वरित १२ पैकी एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे १२ जुलैला सकाळी १० ते ५ या वेळेत विधान भवन, मुंबई येथे मतदान प्रक्रिया पार पडेल.