Rishi Sunak Defeated : ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा दारूण पराभव !

मजूर पक्षाचे किर स्टार्मर होणार नवीन पंतप्रधान !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर  पक्षाचा (कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा) पराभव होऊन मजूर पक्षाचा (लेबर पार्टीचा) दणदणीत विजय झाला आहे. मजूर पक्षाने ६५० पैकी ४०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत, तर पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाला आतापर्यंत केवळ ९२ जागा मिळाल्या आहेत. भारतात भाजप ४०० जागांचा आकडा पार करू शकला नाही; मात्र ब्रिटनमध्ये मजूर पक्षाने ४०० आकडा पार केल्याचे म्हटले जात आहे. या निवडणुकीचा पराभव स्वीकारतांना ऋषी सुनक यांनी ‘मी पराभवाचे संपूर्ण दायित्व स्वीकारतो आणि ब्रिटीश लोकांनी दिलेला महत्त्वपूर्ण संदेश समजतो’, असे म्हटले आहे. मजूर पक्षाचे नेते किर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत. स्टार्मर म्हणाले की, आता पालट व्हायला प्रारंभ झाला आहे. अशा आदेशामुळे आमच्यावर मोठे दायित्व आले आहे.

१. ब्रिटनमध्ये गेल्या १४ वर्षांपासून सत्तेत असलेला हुजूर पक्ष आणि प्रमुख विरोधी मजूर पक्ष हे दोन मोठे पक्ष आहेत. तेथील सत्ता ही या २ पक्षांपैकी एकाकडे असते. त्यातही हुजूर पक्षाला सत्तेत रहाण्याची सर्वाधिक संधी ब्रिटनच्या जनतेने दिली आहे. सध्या हुजूर पक्षाचे नेतृत्व सुनक यांच्याकडे, तर मजूर पक्षाची धुरा एप्रिल २०२० पासून स्टार्मर यांच्याकडे आहे.

२. सुनक ब्रिटनचे राजे तिसरे किंग चार्ल्स यांच्याकडे त्यागपत्र सादर करणार आहेत. त्यानंतर किंग चार्ल्स स्टर्मर यांना संसदेतील सर्वांत मोठा पक्ष या नात्याने सरकार स्थापनेचा दावा करण्यास सांगतील.

संपादकीय भूमिका

भारतीय वंशाचे पंतप्रधान म्हणून ओळख असलेल्या ऋषी सुनक यांनी ब्रिटनमधील हिंदूंसाठी काहीही केले नाही आणि भारतविरोधी खलिस्तान्यांविरुद्धही कठोर कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्या पराभवाचे भारतियांना दुःख वाटणार नाही !