आजपासून विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होणार !
मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या कालावधीत ४ जुलै या दिवशी २ दिवसांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ५ जुलैपासून ते सभागृहात येतील. त्यांच्या निलंबनाविषयी विधान परिषदेत चर्चा झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. अंबादास दानवे यांनी ३ जुलै या दिवशी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली होती.
१. दानवे यांच्या निलंबनाच्या कारवाईसंदर्भात भाजपचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत प्रस्ताव मांडला. ‘दानवे यांच्या निलंबन कालावधीत कपात करावी’, अशी मागणी त्यांनी केली.
२. या वेळी उपसभापती डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या की, दानवे यांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचा निलंबन कालावधी ३ दिवस करत आहोत.
अंबादास दानवे म्हणाले की, निलंबन मागे घेण्यात आले, तरी त्यांनी त्याला बराच विलंब केला आहे. मी दिलगिरी व्यक्त केली होती, तेव्हाच त्यांनी निलंबन मागे घ्यायला हवे होते. तरी त्यांनी यामध्ये ३ दिवस घेतले. मला जरी ३ दिवस सभागृहात येऊ दिले नाही, तरी मी माझा जनता दरबार चालू ठेवला होता. उद्यापासून मी त्याच आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडत रहाणार आहे.