कोल्हापूर – तावडे हॉटेल उड्डाणपूल ते उंचगाव उड्डाणपूल या मार्गावर पोलिसांच्या सूचनेनुसार वाहतूक दिव्यांची यंत्रणा काही वर्षांपूर्वी बसवण्यात आली होती. यानंतर अचानक ही यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे. सध्या ही यंत्रणा बंद असल्याने दोन्ही उड्डाणपुलांखाली मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. तरी तावडे हॉटेल उड्डाणपूल ते उंचगाव उड्डाणपूल या मार्गावरील वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी वाहतूक दिवे चालू करावेत, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगर पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब शिरगिरे आणि मनोज खोत यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी अधिकार्यांनी ही व्यवस्था पूर्ववत् चालू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख श्री. पोपट दांगट, सर्वश्री दीपक फ्रेमवाला, वीरेंद्र भोपळे, दिलीप सावंत, ‘राष्ट्रहित प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. शरद माळी, ‘फेरीवाला संघटने’चे श्री. कैलास जाधव यांसह अन्य उपस्थित होते.