रोम (इटली) – इटलीमध्ये भारतीय कामगार सतनाम सिंह यांच्या मृत्यूवरून भारताने इटली सरकारकडे कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर इटलीच्या पोलिसांनी शेतमालक अँटोनेलो लोवाटो याला अटक केली. त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि मनुष्यवध यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
इटलीतील रोमजवळील लॅझिओ येथील भाजीपाल्याच्या शेतात काम करत असतांना ३१ वर्षीय सतनाम सिंह यांचा हात कापला गेला होता. रुग्णालयात नेण्याऐवजी शेतमालकाने सतनाम यांना रस्त्यावर बाजूला फेकून दिले होते. त्यांना अनुमाने दीड घंटे कोणतीही वैद्यकीय सेवा देण्यात आली नाही. त्यानंतर अन्य लोकांनी सतनाम यांना रुग्णालयात भरती केले. तेथे उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारत सरकारने इटलीकडे प्रश्न उपस्थित केला होता.
इटलीमध्ये होते स्थलांतरित कामगारांचे शोषण !
इटलीतील शेतांमध्ये कामगारांचे शोषण केले जाते. यामुळे अनेकदा हिंसाचारही होतो. ही एक जुनी समस्या आहे, ज्यावर अद्याप उपाययोजना काढण्यात आलेली नाही. लॅटिना येथे सहस्रो स्थलांतरित कामगारांची घरे आहेत, त्यांपैकी बरेच जण शीख आहेत. ते येथील शेतात काम करतात.