तुमच्या देशाला विरांची आवश्यकता आहे. वीर बना. पर्वताप्रमाणे दृढ व्हा ! तुमचा निश्चय कधीही ढळू देऊ नका. ‘सत्यमेव जयते’ – सत्याचा सर्वदा विजय होतो. जी राष्ट्राच्या नसानसांतून नव्या उत्साहाचा संचार करील, अशा एका नव्या विद्युत्शक्तीची, एका नव्या सामर्थ्याची भारताला आवश्यकता आहे. शूर व्हा ! शूर व्हा !! माणूस तर एकदाच मरतो, माझ्या शिष्यांनी भित्रे होता कामा नये. मला भित्रेपणाची चीड येते. अगदी घोर आपत्तीतही मनाचा समतोल राहू द्या. क्षुल्लक पोरकट माणसे तुमच्याविरुद्ध काय म्हणतात, याकडे मुळीच लक्ष देऊ नका. उपेक्षा ! उपेक्षा ! उपेक्षा ! लक्षात असू द्या की, डोळे २ आहेत, कानही २ आहेत; पण तोंड मात्र एकच आहे. सर्व महान कार्ये ही पर्वतप्राय विघ्नांमधूनच साध्य होत असतात. आपले पौरुष आणि पराक्रम प्रकट करा. कामकांचनात जखडलेल्या क्षुल्लक लोकांकडे उपेक्षेच्या दृष्टीनेच बघितले पाहिजे.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)