ईडीकडून मुंबईतील १२ ठिकाणी धाडी !

९७५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण

मुंबई – अंमलबजावणी संचलनालयाने बँक फसवणुकीप्रकरणी मुंबईत १२ ठिकाणी धाडी घातल्या. मे. मंधाना इंडस्ट्रीज् आणि इतरांशी संबंधित ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली. शोध मोहिमेमुळे ५ कोटी रुपयांचे शेअर्स आणि सिक्युरिटीज् गोठवण्यात आले, तसेच बँक खाती आणि लॉकर्स गोठवण्यात आले. या कारवाईत वाहने आणि महागडी घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. मंधाना इंडस्ट्रीज्, पुरुषोत्तम मंधाना, मनीष मंधाना, बिहारीलाल मंधाना आणि इतरांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी या प्रकरणी चौकशी करत आहे. बँक ऑफ बडोदाच्या नेतृत्वाखाली बँक समुहाची ९७५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार होती. यात गुन्ह्यांतील रक्कम इतरत्र वळवण्यात आल्याचा आरोप आहे. या कारवाईत १४० हून अधिक बँक खाती, ५ लॉकर्स आणि पाच कोटींच्या ठेवी गोठवण्यात आल्या आहेत. मर्सडीज, लेक्सससारख्या महागड्या गाड्या, तसेच रोलेक्स, हब्लॉटसह अनेक महागडी घड्याळे ईडीने जप्त केली आहेत.