एफ्.सी. रोडवरील ‘एल् थ्री’ बारमधील मेजवानीसाठी पुण्यातूनच अमली पदार्थांचा पुरवठा झाल्याचे उघड !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – येथील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्विड लीजर लाउंज (एल् थ्री) बारमध्ये झालेल्या मेजवानीतील तरुणांना अमली पदार्थांचा पुरवठा पुण्यातूनच झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणातून ही गोष्ट समोर आली आहे. यापूर्वी पोलिसांनी हे अमली पदार्थ मेजवानीत सहभागी झालेल्या तरुणाने मुंबईतून आणल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्या गुन्ह्यात अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यानुसार (एन्.डी.पी.एस्.) कलमवाढ करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी सांगितले. पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात १० जणांना अटक केली आहे, तर मेजवानीत सहभागी झालेल्या ९ जणांचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली आहे. त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

अमली पदार्थ विक्रेता कह्यात !

अमली पदार्थांचा पुरवठा करणारा अमली पदार्थ विक्रेता अभिषेक याला पुणे पोलिसांनी कह्यात घेतले आहे.