MLA Resignation : महाराष्‍ट्रातील ८ विधानसभा आमदारांचे त्‍यागपत्र !

  • पावसाळी अधिवेशन २०२४

  • विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्‍थगित !

मुंबई, २७ जून (वार्ता.) – राज्‍य विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनास २७ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ‘वन्‍दे मातरम्’ आणि ‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या राज्‍यगीताने प्रारंभ झाला. या वेळी विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्‍या आमदारांनी विधानसभा सदस्‍यत्‍वाचे त्‍यागपत्र दिले आहे, अशा ८ आमदारांची नावे सभागृहात वाचून दाखवली. त्‍यानंतर सभागृहात शोक प्रस्‍ताव मांडून दिवंगत सदस्‍यांना श्रद्धांजली वहाण्‍यात आली. त्‍यानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्‍थगित करण्‍यात आले.

राजू पारवे (उमरेड), नीलेश लंके (पारनेर), प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्‍य), बळवंत वानखेडे (दर्यापूर), श्रीमती प्रतिभा धानोरकर (वरोरा), संदीपान भुमरे (पैठण), रवींद्र वायकर (जोगेश्‍वरी पूर्व विधानसभा), वर्षा गायकवाड (धारावी विधानसभा), अशी विधानसभा सदस्‍यत्‍वाचे त्‍यागपत्र दिलेल्‍या आमदारांची नावे आहेत. त्‍यानंतर महाराष्‍ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना (सुधारणा) अध्‍यादेश, २०२४ आणि महाराष्‍ट्र राज्‍य कौशल्‍य विद्यापीठ (सुधारणा) विधेयक २०२४ पटलावर ठेवण्‍यात आले.

यानंतर पांडुरंग पाटील (सडोलीकर), प्रतापराव भोसले, श्रीमती मिनाक्षी पाटील, गंगाधर गाडे, त्र्यंंबक कांबळे, दगडू गलंडे, डॉमनिक जॉन गोन्‍सालवीस, विश्‍वास गांगुर्डे, गंगाराम ठक्‍करवाड या आजी माजी विधानसभा सदस्‍यांच्‍या दुःखद निधनाविषयी शोक प्रस्‍ताव घेण्‍यात आला.

विधानभवनाच्‍या पायर्‍यांवर विरोधकांचे आंदोलन !

२७ जूनपासून विधीमंडळाच्‍या अधिवेशनाला प्रारंभ होताच शेतकर्‍यांच्‍या सूत्रावर आक्रमक होत विरोधकांनी विधानभवनाच्‍या पायर्‍यावर बसून घोषणा दिल्‍या. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधीमंडळ परिसरात आल्‍यानंतर महाविकास आघाडीच्‍या आमदारांनी घोषणा देऊन सरकारच्‍या विरोधात रोष व्‍यक्‍त केला.