Anti-Hindu OTT Platforms : धर्महानी करणार्‍या ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’वर अंकुश ठेवणारे परिनिरीक्षण मंडळ आवश्‍यक ! – ज्‍योत्‍सना गर्ग, महासचिव, ‘नेशन फर्स्‍ट कलेक्‍टिव्‍ह’

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशन – द्वितीय दिवस (२५ जून)

(ओटीटी मंचावरून दर्शक चित्रपट, वेब सिरीज आदी मनोरंजनात्‍मक कार्यक्रम पहातात.)

विद्याधिराज सभागृह – चित्रपटांसाठी ‘चित्रपट परिनिरीक्षण मंडळ’(सेंसॉर बोर्ड) असल्‍याने समाजासाठी हानीकारक असलेल्‍या चित्रपटांवर अंकुश ठेवता येतो. त्‍याप्रमाणे ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म’साठी कोणतेही ‘परिनिरीक्षण मंडळ’ नसल्‍याने त्‍याद्वारे मोठ्या प्रमाणात हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांच्‍या विरोधातील गोष्‍टी प्रसारित होत असतात. अशा ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’वर अंकुश ठेवण्‍यासाठी ‘परिनिरीक्षण मंडळ’ स्‍थापन करावे, अशी मागणी सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी सरकारकडे करावी, असे प्रतिपादन ‘नेशन फर्स्‍ट कलेक्‍टिव्‍ह’च्‍या महासचिव (सुश्री) ज्‍योत्‍सना गर्ग यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या दुसर्‍या दिवशी केले. ‘चित्रपटांतून दाखवण्‍यात येणार्‍या हिंदुविरोधी प्रसंगांना रोखण्‍यासाठी करण्‍यात येणारे प्रयत्न’ या विषयावर बोलत होत्‍या.

ज्‍योत्‍सना गर्ग या ‘चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’च्‍या सल्लागार मंडळाच्‍या सदस्‍या आहेत. त्‍यांनी त्‍यांच्‍या स्‍तरावर देश, हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांची विटंबना करणार्‍या विविध चित्रपटांना विरोध केला आहे. त्‍यामुळे काही चित्रपट प्रसारित होऊ शकले नाहीत, तर काही चित्रपटातील विटंबनात्‍मक भाग वगळण्‍यात आला आहे. त्‍या पुढे म्‍हणाल्‍या,  ‘‘चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्‍या यांचा समाजावर सखोल प्रभाव पडतो. भारतात चित्रपट बनवण्‍यासाठी विदेशी संस्‍थांकडून आर्थिक साहाय्‍य मिळते. त्‍यांना हिंदु धर्म आणि संस्‍कृती नष्‍ट करायची असल्‍याने ते धर्म-संकृतीविरोधी चित्रपटांना अधिक प्रमाणात आर्थिक साहाय्‍य करतात. अशा चित्रपटांना सर्वांनी संघटित होऊन विरोध करणे आवश्‍यक आहे. यासमवेतच हिंदूंनी त्‍यांच्‍या घरातील मुलांवर ‘सेंसॉर’ (अंकुश) ठेवणे आवश्‍यक आहे. मुले भ्रमणभाषवर काय पहातात, याकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांवर लहानपणापासून धार्मिक संस्‍कार केले, तर ते लव्‍ह जिहाद किंवा धर्मांतर यांना बळी पडणार नाहीत, तसेच आपल्‍या मुलांना धर्म, संस्‍कृती आणि मंदिरे यांच्‍याशी जोडले पाहिजे. त्‍यामुळे हिंदूंच्‍या अर्ध्‍या समस्‍या संपतील.’’