|
मुंबई, २६ जून (वार्ता.) – शेतभूमी आणि पर्यावरण यांचा विध्वंस रोखण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तात्काळ रहित करून तो पैसा शक्तीपीठ महामार्गावरील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी खर्च करावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी २६ जूनला पत्रकार परिषदेत केली. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.
LIVE : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद https://t.co/XI9Kf3l0o0
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 26, 2024
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ‘नीट’ परीक्षा आता दलालांच्या हातात गेली आहे. तरीही महाराष्ट्र सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना वार्यावर सोडले आहे. राज्यात तलाठी भरतीमध्ये, तसेच इतर भरती परीक्षांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या अधिवेशनात पेपरफुटीविरोधात सरकारने कठोर कायदा करावा, यासाठी आम्ही आवाज उठवणार आहोत. शिक्षणमंत्री जाहीर कार्यक्रमात ‘मनुस्मृतीचा श्लोक आम्ही पाठ्यपुस्तकात समाविष्ट करू’, असे सांगतात. सरकारच्या या चातुवर्ण व्यवस्था आणण्याच्या धोरणाला आम्ही कडाडून विरोध करू. विदर्भ आणि मराठवाडा येथील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणासह उर्वरित महाराष्ट्रात नव्याने विकासाचा अनुशेष निर्माण होत आहे.
विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार !
राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून चालू होत आहे. विरोधकांनी त्यांची परंपरा कायम ठेवत पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.