Hinduja Family : नोकरांचे शोषण केल्याच्या प्रकरणी हिंदुजा कुटुंबाची स्वित्झर्लंड उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

एक दिवस आधी कनिष्ठ न्यायालयाने केली होती शिक्षा

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील भारतीय वंशाचे उद्योगपती हिंदुजा कुटुंबातील ४ जणांची २२ जून या दिवशी स्वित्झर्लंडच्या उच्च न्यायालयाने सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. २१ जून या दिवशी कनिष्ठ न्यायालयाने या ४ जणांना नोकरांचे शोषण केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा सुनावली होती. तक्रारादाराने तक्रार मागे घेतल्यानंतर ही शिक्षा रहित करण्यात आली. उद्योगपती प्रकाश हिंदुजा आणि त्यांची पत्नी कमल हिंदुजा यांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर त्यांचा मुलगा अजय आणि सून नम्रता यांना ४ वर्षांची शिक्षा झाली होती.

हिंदुजा कुटुंबावर त्यांच्या स्वित्झर्लंड व्हिलामध्ये काम करणार्‍या लोकांचे शोषण केल्याचा आरोप होता. त्यांपैकी बहुतेक भारतातील निरक्षर लोक होते.