कोथरूड (पुणे), २२ जून (वार्ता.) – शिवराज्याभिषेकदिन अर्थात् हिंदुसाम्राज्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माधवबाग प्रभात शाखा यांच्या वतीने वार्षिक उत्सव अर्थात् कुटुंब मेळावा आयोजित करण्यात आला होता. २० जून या दिवशी कोथरूड येथील अमेय हॉल, शिवतीर्थनगर येथे आयोजित केलेल्या कुटुंब मेळाव्यात नगरसंघचालक श्री. हिरामण जगताप, हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, तसेच शाखेचे इतर स्वयंसेवक उपस्थित होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि पू. माधव सदाशिवराव गोळवलकरगुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा आरंभ झाला. श्री. हिरामण जगताप यांनी ध्वजपूजन केले.
हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ‘राष्ट्र, धर्माची सद्यःस्थिती, हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि कुटुंबप्रबोधन’ या विषयावर कु. क्रांती पेटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कु. क्रांती पेटकर यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेकदिन हा समस्त हिंदूंसाठी स्वाभिमान प्रकट करणारा दिवस आहे; परंतु दुर्दैवाने आजचा बहुतांश हिंदु समाज महाराजांचा पराक्रमी इतिहास विसरला असल्यामुळे पुन्हा एकदा महाराजांच्या जन्मापूर्वी जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आजही आहे. आपापसातील मतभेद विसरून केवळ हिंदु म्हणून संघटित होणे आणि हिंदु राष्ट्र स्थापन करणे हीच महाराजांच्या चरणी खरी आदरांजली असेल.
त्यानंतर उपस्थित सर्वांनी प्रतिदिन देवासमोर हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना करण्याचा संकल्प केला आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात त्याला अनुमोदन दिले. या कार्यक्रमाचा लाभ ९५ हून अधिक जणांनी घेतला. कार्यवाहक श्री. चंद्रकांत नामजोशी यांनी प्रास्ताविक केले, त्यात मागील वर्षाचा आढावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून आतापर्यंत कार्याचा विस्तार कसा झाला ? आणि शाखेच्या वतीने वर्षभरात कोणकोणते उपक्रम राबवले जातात, याची थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन आणि प्रार्थना यांनी झाली.
सत्कार !
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात २ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, यामध्ये सनातन संस्थेची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली युवा साधिका कु. प्राजक्ता प्रवीण नाईक हिचा ग्रंथ भेट देऊन आणि रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांचा भारतमातेची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.