रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस !

  • जगबुडी नदीने धोकादायक पातळी गाठली

  • परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली

रत्नागिरी – जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मागील २ दिवसांत सतत पडलेल्या पावसामुळे खेड येथील जगबुडी नदीने धोकादायक पातळी गाठली आहे, तर दुसरीकडे परशुराम घाटातील महामार्गाची संरक्षक भिंत कोसळल्याने मुख्य महामार्गालाच धोका निर्माण झाला आहे.

खेड आणि चिपळूण तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे  जगबुडी नदीची पाणीपातळी ५.२५ मीटर इतकी वाढली आहे. प्रतिवर्षी पावसाचा पूर्वानुभव लक्षात घेत येथील प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.

चिपळूण जवळील परशुराम घाटात २१ जूनच्या पहाटे ५.३० वाजता संरक्षक भिंत आणि मातीचा भराव कोसळला आहे. संरक्षक भिंत कोसळल्याने मातीचे ढिगारे वाहू लागले आहेत. घाटातील अनुमाने २०० मीटरचा भाग खचला आहे. या घटनेनंतर तात्काळ महामार्गाची एक मार्गिका बंद करण्यात आली असून एकेरी वाहतूक चालू करण्यात आली आहे. पोलीस, प्रशासकीय अधिकारी, तसेच ठेकेदार आस्थापनाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले आहेत.

सोनगाव येथील घरावर संरक्षक भिंत कोसळली

खेड तालुक्यातील सोनगावातील भोईवाडीत घरावर संरक्षक भिंत कोसळून घराची  हानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे भूमी खचून संरक्षक भिंत पुष्पा पारधी यांच्या घरावर कोसळली.

संपादकीय भूमिका

मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणानंतर प्रत्येक पावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळण्याची घटना घडते. यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र आता घाटात नवीन बांधलेली संरक्षक भिंतच कोसळल्याने ठेकेदार आस्थापनाने निकृष्ट काम केले नाही ना ? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे !