११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी साधिकांनी श्रीविष्णूच्या दशावतारांवर आधारित नृत्य सादर केले. हे नृत्य पहातांना ‘सात्त्विक नृत्या’विषयी माझे चिंतन झाले.
‘संगीतकलेतून ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय साध्य होण्याच्या दृष्टीने अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने संशोधनात्मक प्रयोग आणि अभ्यास केला जातो. ‘कलेला तम-रज स्थितीतून सात्त्विकतेकडे नेणे आणि शेवटी केवळ ‘ईश्वरप्राप्तीसाठीच कला’ या स्थितीपर्यंत येणे’, असा हा प्रवास आहे. यासाठी समाजात प्रबोधनही केले जाते. ११.५.२०२३ या दिवशी झालेल्या सात्त्विक नृत्यात वरील हेतू साध्य झाल्याचे मला अनुभवायला मिळाले. नृत्य सादर करणारे कलाकार, त्यांचे पोषाख, अलंकार आणि शृंगार, नृत्याचे पदन्यास, हावभाव (अभिनय) नृत्याचे संगीत, प्रेक्षकवर्ग आणि नृत्य सादरीकरणाचे स्थल असे सर्वच घटक सात्त्विक होते.
१३ जून २०२४ या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/803504.html
६. कु. अपाला औंधकर हिने साकारलेले श्रीविष्णूच्या गरुड वाहनाचे रूप
कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे आणि आध्यत्मिक पातळी ६१ टक्के) हिने साकारलेल्या श्रीविष्णूच्या गरुड वाहनाचे रूप पहातांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराजमान झालेल्या रथावर कोरलेल्या गरुडाच्या चित्राचे स्मरण होत होते. कु. अपाला हिने गरुड रूप दर्शवण्यासाठी आपले दोन्ही हात दोन बाजूंना पसरले होते. ते गरुडाचे विविध स्तर असलेल्या पंखांप्रमाणे जाणवत होते.
७. सात्त्विक गीत
नृत्य सादर करतांना त्याचे गीत आणि त्या गीताला दिलेले संगीत हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. ब्रह्मोत्सवात सादर केलेल्या नृत्याचे गीत हे ‘अच्युताष्टकम्’ वर (श्रीमद् आद्यशंकराचार्यांच्या श्रीकृष्णावरील स्तुतीगानावर) आधारित होते. गीत आणि गीताचे संगीत दोन्हीही सात्त्विक होते.
८. सात्त्विक प्रेक्षकवर्ग
ब्रह्मोत्सवात नृत्य सादर करणारे कलाकार साधिका होत्या, तसे नृत्य पहाणारे प्रेक्षकही सदगुरु, संत आणि साधक होते. त्यामुळे वातावरणात भावाचे प्रक्षेपण पुष्कळ अधिक प्रमाणात झाले होते.
व्यावहारिक नृत्यात प्रेक्षकांच्या मनात नृत्य चांगले झाल्यास उत्तेजना निर्माण होते. त्यातून टाळ्या वाजवणे, ओरडणे अशा कृती प्रेक्षकांकडून होतात; परंतु ब्रह्मोत्सवात नृत्य पहाणारे काही साधक ‘मानसभावाने स्वत: ते नृत्य करत आहेत’, असे अनुभवत होते. काही साधक प्रत्यक्ष श्रीविष्णूच्या त्या त्या अवताराच्या वेळी भगवंतालाच भावपूर्णपणे अनुभवत होते, तर काही साधक ‘भक्तीभावाने’ संबंधित अवतार सादर करतांना याचकभावाने भगवंताला आळवत होते. नृत्य भावपूर्ण होण्याचे एक कारण, म्हणजे बरेच प्रेक्षक अंतर्मुख होऊन अंतर्मनातून भगवंताला अनुभवत होते. त्यामुळे नृत्याच्या सात्त्विकतेत भर पडली.
९. लोकेषणा किंवा कौतुकाची अपेक्षा नसणे
नृत्य सादर करणार्या साधिका सेवाभावाने या नृत्यात सहभागी झाल्या होत्या. सगळ्यांच्याच मनात ‘नृत्य गुरुचरणी समर्पित व्हावे’, हा शुद्ध भाव होता. केवळ गुरुकृपा संपादन करण्यासाठीच साधिका नृत्य सादर करत असल्याचे सतत अनुभवायला येत होते.
‘लोकेषणा किंवा कौतुकाची अपेक्षा नसणे’ हे सूत्र ईश्वरप्राप्तीसाठी कला’ या दृष्टीकोनातून विशेष महत्त्वाचे आहे. लोकेषणा किंवा कौतुकाची अपेक्षा नसलेल्या आणि गुरुकृपा संपादन करण्याचा नृत्याचा उद्देश असलेल्या साधिकांच्या संदर्भात हे सतत अनुभवायला येत होते.
१०. साधिकांचा नृत्य सेवाभावाने आणि परिपूर्ण करण्याचा ध्यास नृत्यात आढळणे
व्यवहारात शास्त्रीय नृत्य सामूहिकरित्या सादर करतांना सर्व कलाकारांचे हावभाव एकसारखे असावे लागतात; परंतु परिपूर्ण आणि भावपूर्ण नृत्य सादर करण्यासाठी त्यात सहभागी सर्वांची ‘मने एक असणे’ अत्यावश्यक असते. ब्रह्मोत्सवात नृत्य सादर करतांना सहभागी साधिकांची मने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी समर्पित होती. गुरुदेवांच्या कृपेने सर्वांच्या चेहर्यावर त्यांच्याप्रतीचा भाव सहज दिसून येत होता. साधिकांचा सेवाभावाने आणि परिपूर्ण नृत्य करण्याचा ध्यास या नृत्यात पहायला मिळाला.
११. नृत्यातील अनुभवापेक्षा गुरुकृपाच महत्त्वाची असल्याचे जाणवणे
नृत्य सादर करतांना विशेषतः ‘देवतांवर आधारित नृत्य सादर करतांना त्याची अनुभूती प्रथम कलाकाराने स्वत: घ्यायला हवी, तरच तशी अनुभूती प्रेक्षकांना येऊ शकते. कलेच्या सादरीकरणातील हे महत्त्वाचे शास्त्र आहे. ब्रह्मोत्सवातील नृत्य पहातांना मला साधिकांकडे पाहून ही अनुभूती आली. या नृत्यात सहभागी साधिका साधनारत असल्याने ‘स्वत: भगवंताची अनुभूती घेत नृत्य सादर करणे’, हे त्यांना सहजपणे जमले. हे सादरीकरण करतांना साधिकांना नृत्याचे विशेष ज्ञान नव्हते; परंतु सेवा म्हणून गुरुकृपेच्या आधारे त्यांनी हे नृत्य सादर केले. त्यामुळे ‘कलाकाराच्या नृत्यातील अनुभवापेक्षा गुरुकृपाच महत्त्वाची आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवले.
१२. ‘भाव, भक्ती आणि परमानंद यांनी युक्त असे हे नृत्य, म्हणजे भक्तांनी सादर केलेली कला आणि भगवंत यांचे मीलनच आहे’, असे वाटणे
श्रीविष्णूस्वरूप गुरुदेव प्रत्यक्ष ते नृत्य पहात होते. त्यामुळे दशावतार सादर करतांना ‘त्या त्या अवताराच्या तत्त्वाचे तेथे प्रकटीकरण होत आहे’, असेच जाणवत होते. त्यामुळे ‘भाव, भक्ती आणि परमानंद यांनी युक्त असे हे नृत्य, म्हणजे भक्तांनी सादर केलेली कला आणि भगवंत यांचे मीलनच आहे’, असे वाटत होते.
१३. महर्षींच्या संकल्पामुळे नृत्य आध्यात्मिक स्तरावर होणे
ब्रह्मोत्सवात महर्षींच्या आज्ञेने नृत्य-गायन सादर झाले. नृत्य आध्यात्मिक स्तरावर होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे महर्षींचा संकल्प होय. हे नृत्य सादर करण्याचे विशेष औचित्य म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव हे होते. त्यामुळे सर्वच स्तरांवर विशेष असलेल्या या महोत्सवातील नृत्यही विशेष झाले.
नृत्यातील सर्व घटक आणि नृत्य सादर करण्याचा उद्देश असे सर्वच ईश्वराशी जोडणारे होते. त्यामुळे हे नृत्य सात्त्विक आणि ईश्वरीय झाले. तेव्हा ‘हिंदु राष्ट्रात प्रत्येक कलेचे सादरीकरण सात्त्विक होणार असून प्रत्येक कला ही कलाकार आणि प्रेक्षक यांना ईश्वराशी जोडणारी असेल’, याची निश्चिती वाटून माझे मन कृतज्ञतेने भरून आले.
वरील सूत्रांचे लिखाण माझ्याकडून करवून घेतल्याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
(समाप्त)
– होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी (भरतनाट्यम् विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.६.२३)
|