Canada  Parliament Tribute Nijjar : संसदेत खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंग निज्जर याला वाहिली श्रद्धांजली !

कॅनडाने भारताला पुन्हा डिवचले !

ओटावा (कॅनडा) – खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडातील सरे शहरात १८ जून २०२३ या दिवशी हत्या करण्यात आली होती. आता कॅनडाच्या संसदेत निज्जर याच्या हत्येच्या वर्षपूर्तीनिमित्त त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी १८ जून या दिवशी २ मिनिटांचे मौन पाळण्यात आले. यापूर्वी कॅनडाने निज्जर हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला आहे; मात्र त्याला याविषयी कोणताही पुरावा सादर करता आलेला नाही.

१८ जून या दिवशी कॅनडाच्या संसदेत कामकाजाच्या शेवटी संसदेचे अध्यक्ष ग्रेग फेर्गस म्हणाले, ‘‘या सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मला असे वाटते की, वर्षभरापूर्वी हरदीप सिंग निज्जर याची ब्रिटीश कोलंबियाच्या परिसरात हत्या करण्यात आली. या घटनेला १ वर्ष झाल्यानिमित्त सभागृहात २ मिनिटांचे मौन पाळण्यावर सर्व सभासदांनी सहमती दर्शवली आहे.’’ यानंतर सभागृहातील सर्व सभासद उठून उभे राहिले आणि त्यांनी २ मिनिटांचे मौन पाळून नंतर कामकाज संपवले.

भारताचे कॅनडाला प्रत्युत्तर !

खलिस्तानी आतंकवाद्यांनी ‘कनिष्क’ विमानावर केलेल्या आक्रमणातील मृतांसाठी कॅनेडात श्रद्धांजली सभेचे आयोजन !

कॅनडातील भारतीय वाणिज्य दूतावासाने निज्जर याला श्रद्धांजली वाहण्याच्या कॅनडाच्या कृतीला प्रत्युत्तर दिले आहे. दूतावासाने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘भारत आतंकवादाच्या विरोधात असून या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देशांसमवेत एकत्र काम करत आहे. २३ जून २०२४ या दिवशी एअर इंडियाच्या १८२ (कनिष्क) या विमानावरील आतंकवादी आक्रमणाचा ३९ वा स्मृतीदिन आहे, या आक्रमणात ३२९ निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. मृतांमध्ये ८६ मुलांचाही समावेश आहे. नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासातील ही सर्वांत घृणास्पद आतंकवादी घटना आहे. या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २३ जून २०२४ या दिवशी कॅनडातील व्हँकुव्हरमधील स्टॅनले पार्कमधील एअर इंडिया मेमोरियलमध्ये स्मारक सेवा येथे श्रद्धांजली सभा आयोजित केली जाईल. या कार्यक्रमाला अधिकाधिक भारतीय वंशाच्या लोकांनी उपस्थित रहावे आणि आतंकवादाविरुद्ध एकजूट दाखवावी.’’ या आक्रमणाला कॅनडाचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे नंतर उघड झाले होते. यामुळेच असा कार्यक्रम आयोजित करून भारताने कॅनडाला प्रत्युत्तर दिले आहे.


काय आहे घटना ?

२२ जून १९८५ या दिवशी एअर इंडियाच्या विमानाने कॅनडातील मॉन्ट्रियल विमानतळावरून नवी देहलीला जाण्यासाठी उड्डाण केले. दुसर्‍या दिवशी, म्हणजे २३ जून १९८५ या दिवशी जेव्हा विमान आयरिश हवाई क्षेत्रात उड्डाण करत होते, तेव्हा मोठा स्फोट झाला आणि विमानाचे तुकडे होऊन अटलांटिक महासागरात पडले. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा (जून १९८४ मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात भारतीय सैन्याने खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईचे नाव) सूड उगवण्यासाठी खलिस्तानी आतंकवाद्यांनी हे आक्रमण केले होते. या आक्रमणात विमानातील कर्मचार्‍यांसह सर्व ३२९ जणांचा मृत्यू झाला होता. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी कॅनडाच्या सरकारला खलिस्तानी आतंकवाद्यांकडून अशा प्रकारचे आक्रमण होणार असल्याची माहिती दिली होती, तरीही कॅनडा सरकारने दक्षता घेतली नाही.

संपादकीय भूमिका

कॅनडातील ट्रुडो सरकार खलिस्तानी समर्थक असलेल्या शीख खासदारांच्या पाठिंब्यावर चालत असल्याने त्याच्याकडून असेच प्रकार घडणार, याचे आश्‍चर्य वाटू नये !