प्लास्टिकच्या मानवी कवट्यांचे पोते जप्त !
नाशिक – येथे पंचवटी परिसरात एका पोत्यात ५ ते ७ मानवी कवट्या आढळल्या. कवट्या प्लास्टिकच्या असून संशयित अघोरी विद्येच्या पूजेसाठी त्या वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पोते कह्यात घेतले. या प्रकरणी संशयित नीलेश थोरात (वय ३८ वर्षे) याला कह्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पनवेल येथे महिलेचे चित्रीकरण करणार्यावर गुन्हा नोंद
पनवेल – येथील आदई गावातील पँथर अकादमीतील तरणतलावात पोहून झाल्यावर कपडे पालटण्यासाठी गेलेल्या ३४ वर्षीय महिलेचे प्रशिक्षक आदित्य फडके (वय १९ वर्षे) याने चित्रीकरण केले. या प्रकरणी संतप्त महिलेने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
संपादकीय भूमिकाअशांवर कठोर कारवाईच हवी ! |
अकोला येथे ५ जिवंत काडतुसे जप्त !
अकोला – पोलिसांनी येथून देशी बनावट पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसे असा ७१ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी रघुवीर तेलसिंग चौहान (वय ३० वर्षे) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नाशिक येथे गोवंशियांना डांबणारा धर्मांध अटकेत !
नाशिक – येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २३ गोवंशियांची सुटका करण्यात आली आहे. या गोवंशियांचे मूल्य १ लाख ६४ सहस्र रुपये इतके आहे. या प्रकरणी पोलिसांनी रशिद ईस्माईल सय्यद याला अटक करण्यात आली आहे. गोवंशियांना गोशाळेत पाठवण्यात आले आहे.
लातूर येथे चोरी !
लातूर – येथील उदगीर शहरात मध्यरात्री चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह १३ लाख ७५ सहस्र रुपयांचा ऐवज लंपास केला. तुलसीधाम सोसायटी परिसरात ३ चोरट्यांनी सेवानिवृत्त शिक्षक धाडे यांच्या घरात चोरी केली. उदगीर पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉक्टर संपावर !
छत्रपती संभाजीनगर – येथील घाटी रुग्णालयामध्ये ‘रुग्णाला झोपेच्या गोळ्या द्याव्यात’, अशी मागणी नातेवाइकांनी केली होती. डॉक्टरांनी ‘अशा गोळ्या देता येत नाही’, असे म्हटल्यावर नातेवाइकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये डॉक्टर घायाळ झाले. त्याचा निषेध करण्यासाठी आपत्कालीन सेवा वगळता रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी संप पुकारला आहे. अपघात विभागासमोर सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन हे कामबंद आंदोलन आहे, असे सांगत संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.