वेळगे (गोवा) येथे गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला !

गोतस्करांवर कारवाई करण्यात निष्क्रीय ठरलेले पोलीस आणि सरकार यांचा ‘गोवंश रक्षा अभियाना’कडून निषेध

वाळपई, १५ जून (वार्ता.) – वेळगे येथे गुरांची चोरी करून त्यांना हत्या करण्यासाठी नेण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. असाच प्रयत्न १४ जूनच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास वेळगे येथील नागरिकांनी हाणून पाडला. स्थानिकांनी या प्रकारात गुंतलेल्या तिघांचा पाठलाग करून त्यांना कह्यात घेतले; मात्र त्यातील एक जण निसटला. दोघांना स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकारामुळे वेळगे येथे रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

१४ जूनला रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहन गावात आले. या वेळी वाहनासमवेत आलेल्यांनी एका बैलाच्या मालकाला ‘बैल रामनगर (कर्नाटक) येथे शेतीच्या कामासाठी नेतो’, असे सांगून बैल विकत घेऊन तो वाहनामध्ये घालण्याचा प्रयत्न केला. याविषयी स्थानिकांना संशय आल्यावर त्यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांना संबंधित बैल रामनगर येथे नव्हे, तर गोव्यात नाणूस, वाळपई येथे हत्या करण्यासाठी नेण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे स्थानिक आक्रमक झाले आणि त्यांनी तिघांना पकडून ठेवले; मात्र त्यातून एक जण निसटला. स्थानिकांनी पकडून ठेवलेल्या दोघांना बांधून ठेवले. वाळपई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही कह्यात घेतले आणि त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती.

गुरांविषयी सतर्क रहाण्याचे गोप्रेमींचे आवाहन

गोप्रेमींच्या मते सत्तरी तालुक्यात अनेक भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गुरांची चोरी होण्याचे प्रकार घडू लागले आहेत आणि यामुळे ग्रामस्थांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे. वेळगे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार १४ जूनला कह्यात घेण्यात आलेल्या गोतस्करांनी त्या दिवशी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गुरांची तस्करी केल्याचा संशय आहे. संशयितांना ग्रामस्थांनी पकडल्यानंतर संशयितांच्या भ्रमणभाषवर त्यांना गोतस्करीसंबंधी ‘रेकॉर्डिंग’ आढळून आले आहे. संशयितांनी गुरांची तस्करी कुठून केली ? याची माहिती त्यांच्या भ्रमणभाषमध्ये असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गोतस्करांवर कारवाई करण्यासाठी निष्क्रीय झालेले पोलीस आणि सरकार यांचा ‘गोवंश रक्षा अभियाना’कडून निषेध

‘गोवंश रक्षा अभियान’चे अध्यक्ष श्री. हनुमंत परब म्हणाले, ‘‘गुरांची तस्करी हाणून पाडणारे वेळगेवासीय अभिनंदनास पात्र आहेत. गोतस्करी रोखणारे वेळगेवासीय १४ जूनच्या उत्तररात्री ३.३० वाजेपर्यंत वाळपई पोलीस ठाण्यात उपस्थित होते. वेळगे येथे गुरांची तस्करी हाणून पाडल्याच्या प्रकरणी संशयितांवर कारवाई करण्यास पोलीस आणि सरकार निष्क्रीय असल्याचे दिसून आले आहे अन् यामुळेच राज्यात गोवंशियांची अनधिकृतपणे हत्या करण्याचे प्रकार सर्रासपणे चालू आहेत. निष्क्रीय पोलीस आणि सरकार यांचा ‘गोवंश रक्षा अभियान’ निषेध करत आहे.’’

गोवा मांस प्रकल्पात २०० गुरांची ‘कुर्बानी’ देणार

गोवा मांस प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. वीणा कुमार म्हणाल्या, ‘‘१५ ते १८ जून या कालावधीत ‘कुर्बानी’साठी गोवा मांस प्रकल्पात प्राणी आणण्यासाठी राज्याच्या तपासनाक्यांवर अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राण्यांची हत्या करण्यापूर्वी त्यांची चाचणी करण्यासाठीही अधिकारी नेमण्यासाठी आदेश काढण्यात आला आहे. राज्याचे पशूसंवर्धन खाते आणि गोवा मांस प्रकल्प संयुक्त विद्यमाने ‘कुर्बानी’ प्रथा पाळणार आहे. गोवा मांस प्रकल्पात २०० प्राण्यांची ‘कुर्बानी’ देण्यात येणार आहे.’’

मतांसाठी हिंदूंच्या गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्याच्या प्रकाराचा निषेध ! – श्री. हनुमंत परब, अध्यक्ष, गोवंश रक्षा अभियान

मुसलमान गोवंश पोसत नाहीत; मात्र सरकार त्यांचे चोचले पुरवत आहे. एकगठ्ठा मतांसाठी हिंदूंच्या गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्यात येत आहे. या प्रकाराचा ‘गोवंश रक्षा अभियान’ निषेध करत आहे, असे मत ‘गोवंश रक्षा अभियान’चे अध्यक्ष श्री. हनुमंत परब यांनी व्यक्त केले.