‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वाचकांशी जवळीक साधणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे अकोला येथील (कै.) श्यामसुंदर राजंदेकर (वय ७८ वर्षे) !

अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) श्यामसुंदर राजंदेकर यांच्या मासिक श्राद्धाच्या निमित्ताने…

‘१६.५.२०२४ या दिवशी अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्यामसुंदर राजंदेकर (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. १५.६.२०२४ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त साधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. श्यामसुंदर राजंदेकर

१. सौ. आनंदी वानखडे

१ अ. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वाचकांशी जवळीक साधणे : ‘समाजातील अनेक व्यक्ती श्याम राजंदेकर यांना (मामांना) ओळखत असत. मामांनी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वाचकांशी चांगली जवळीक साधली होती. ते सर्वांना प्रत्यक्ष भेटत असत. ते सात्त्विक उत्पादने पोचवण्याच्या निमित्ताने समाजातील व्यक्तींना भेटत असत.

१ आ. साधकांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे : ते प्रत्येक सत्संगाच्या शेवटी नामजपादी उपायांविषयी सांगायचे. तेव्हा मला आनंद होत असे. त्या वेळी ‘माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे आवरण दूर झाले आहे’, असे मला जाणवत असे. त्यांच्याकडून मला खर्‍या अर्थाने आध्यात्मिक स्तरावर साहाय्य मिळत असे.’

२. श्रीमती श्रुती भट (वय ६३ वर्षे), अकोला

२ अ. जिज्ञासू वृत्ती : ‘अनुमाने २० वर्षांपूर्वी राजंदेकरमामा सनातनच्या सत्संगात आले होते. तेव्हा त्यांनी सत्संगात जिज्ञासू वृत्तीने अध्यात्माविषयी समजून घेतले आणि शंकानिरसन करून घेतले. त्यांनी सत्संगात सांगितल्यानुसार समष्टी सेवा करण्याचे प्रयत्न केले.

२ आ. प.पू. डॉक्टरांचे आज्ञापालन केल्यावर रक्षण झाल्याची अनुभूती येणे आणि प.पू. डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञताभाव जागृत होणे : एकदा मामांनी मुंबईहून अकोला येथे जाणार्‍या एका आगगाडीचे आरक्षण केले होते. प.पू. डॉक्टरांनी मामांना त्या आगगाडीचे आरक्षण रहित करायला सांगितले. मामांनी त्यांचे आज्ञापालन केले. नंतर समजले, ‘त्या गाडीत स्फोट होऊन बरेच प्रवासी मृत्यूमुखी पडले.’ या प्रसंगानंतर मामांमध्ये प.पू. डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञताभाव जागृत झाला.

२ इ. स्वभावदोष अणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवणे आणि आध्यात्मिक उन्नती होणे : त्यानंतर त्यांनी बुद्धीच्या स्तरावर कधीच प्रश्न विचारले नाहीत. त्यांनी स्वभावदोष अणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवली. त्यांनी साधनेत प्रगती केली आणि आम्हा साधकांनाही साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २७.५.२०२४)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.