व्हिडिओ प्रसारित झाल्याने पोलिसांकडून २० दिवसांनी गुन्हा नोंद

वाकड-हिंजवडी रस्त्यावरील भुजबळ चौकाजवळ तरुणीला चारचाकीची धडक बसल्याचे प्रकरण

हिंजवडी – पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असतांनाच वाकड-हिंजवडी रस्त्यावर भुजबळ चौकाजवळ मोटारीने एका तरुणीला धडक दिल्याचे सीसीटीव्ही चित्रण सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तब्बल २० दिवसांनी गुन्हा नोंद केला आहे. (सामाजिक माध्यमांवर हा विषय प्रसारित झाला नसता, तर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असता का ? ही पोलिसांची कार्यक्षमता आहे का ? – संपादक) आकांक्षा परदेशी असे अपघातात घायाळ झालेल्या तरुणीचे नाव असून ती हिंजवडी येथे शिक्षण घेते. तरुणीचा भाऊ उत्कर्ष परदेशी यांनी दिलेल्या तक्रारी अन्वये वाहनचालक तुषार नेमाडे (वय ४६) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या अपघाताची पोलीस दरबारी काहीच नोंद नसल्याने प्रसिद्धीमाध्यमांनी विचारणा केल्यावर हिंजवडी पोलिसांनी तरुणीच्या भावाला बोलावून तक्रार घेतली. अपघातात तरुणीला मुका मार लागला.