मार्केट यार्ड (पुणे) येथील गंगाधाम परिसरातील नागरिकांचा ‘रास्ता रोको’ !

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

पुणे – मार्केट यार्ड भागातील गंगाधाम चौक परिसरामध्ये भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. या भागात दिवसा जड वाहनांना बंदी असतांना वाहतूक चालू आहे, जड वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. (नियमानुसार पोलिसांकडून कारवाई का करण्यात येत नाही ? उत्तरदायी पोलिसांवरही कारवाई हवी. – संपादक) नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाने जड वाहनांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गंगाधाम भागातील संतप्त नागरिकांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. आंदोलनस्थळी पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गंगाधाम रस्त्यावर भरधाव डंपरने मागून दुचाकीला धडक दिल्याने दमयंती सोळंखी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची सून प्रियंका या घायाळ झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. डंपरचालक अशोक महंतो आणि त्यांचा साहाय्यक गणेश बांदल यांना अटक करण्यात आली आहे.