सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे ‘इको’ चाचणी करण्यात येणारे अडथळे दूर होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. शारीरिक त्रास होत असल्यामुळे आधुनिक वैद्यांना दाखवल्यावर त्यांनी तातडीने ‘इको’ चाचणी करण्यास सांगणे

‘३०.५.२०२३ या दिवशी मी मला होणार्‍या शारीरिक त्रासांसाठी आधुनिक वैद्यांना दाखवायला सरकारी रुग्णालयात गेले होते. त्यांनी तातडीने मला ‘इको’ चाचणी करायला सांगितली. ही चाचणी झाल्यावर ‘मला नेमके काय दुखणे आहे ?’, ते कळणार होते. त्यावर ‘माझे शस्त्रकर्म करावे लागेल कि औषधे घेऊन दुखणे बरे होऊ शकेल ?’, ते ठरणार होते. चाचणी लवकर झाली नाही, तर उपचार करायला उशीर होईल. त्यामुळे ‘दुखणे वाढून त्रास वाढण्याची शक्यता आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले.

२. ‘इको’ चाचणी करण्यात आलेले अडथळे

सौ. सुषमा नाईक

२ अ. ‘इको’ चाचणी करण्यासाठी जवळचा दिवस न मिळणे : ‘इको’ चाचणी करण्यासाठी मला जवळचा दिवस मिळत नव्हता. तेव्हा आधुनिक वैद्यांनी केसपेपरवर ‘लवकरात लवकर ‘इको’ चाचणी करणे आवश्यक आहे’, असे लिहून दिल्यावर मला थोड्या जवळचा एक दिवस मिळाला. तो दिवस अमावास्येचा होता. मला सकाळी १० ची वेळ मिळाली होती.

२ आ. ‘इको’ चाचणीच्या थोडा वेळ आधी हृदयाचे ठोके पुष्कळ वाढणे : चाचणीच्या दिवशी सकाळी मी नियोजित वेळेपूर्वी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात पोचले. तिथे प्रत्यक्ष चाचणी करण्यापूर्वी माझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती मोजण्यात आली, तेव्हा ती १३० होती. परिचारिका मला म्हणाली, ‘‘हृदयाची गती सर्वसाधारण, म्हणजे ९० असायला हवी. आपण थोड्या वेळाने परत बघू. तोपर्यंत तू एका जागेवर शांत बसून, एका लयीत श्वास घे.’’ परिचारिका पुनःपुन्हा काही वेळाने येऊन माझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती तपासत होती; पण ती तेवढीच येत होती.

२ इ. हृदयाच्या ठोक्यांची गती अजून वाढल्यामुळे ‘इको’ चाचणी करता येणार नसणे : परिचारिकेने सांगितल्याप्रमाणे मी शांत बसून एका लयीत श्वास घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हळूहळू माझ्यानंतर आलेल्या रुग्णांची चाचणी होऊन ते घरी जाऊ लागले. मी एकटीच बाहेर बसून होते. त्या परिचारिकेने मला जे काही उपचार करायला सांगितले होते, ते सर्व मी केले; पण माझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती काही न्यून होत नव्हती. परिचारिकेने अजून काही वेळाने तपासले, तेव्हा ते १५० झाले होते; म्हणून परिचारिका मला म्हणाली, ‘‘तुझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती अधिक आहे. त्यामुळे आज तुझी ‘इको’ चाचणी होऊ शकणार नाही.’’

३. ‘इको’ चाचणी व्हावी’, यासाठी तळमळीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आळवणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना संपर्क करून अडचणी सांगणे

‘इको’ चाचणीसाठी हा दिवसही मोठ्या प्रयत्नाने मिळाला आहे. ‘आता माझी चाचणी झाली नाही, तर मला होणारे त्रास वाढतील’, अशी मला भीती वाटू लागली. मी व्याकुळतेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केली आणि सद्गुरु गाडगीळकाकांना संपर्क करून सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी मला त्रासदायक आवरण काढायला सांगितले आणि ‘निर्गुण’ हा नामजप अन् मुद्रा सांगितली. ते म्हणाले, ‘‘दुपारी १२.३० पर्यंत हळूहळू त्रास न्यून होईल.’’

४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर हृदयाची गती सामान्य होऊन ‘इको’ चाचणी करता येणे

सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितल्याप्रमाणे मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करत मुद्रा करून भावपूर्ण नामजप करत राहिले. मी सूक्ष्मातून माझ्यावरचे आवरण काढत होते. रुग्णालयामध्ये मुद्रा करून नामजप करणे कठीण होते; पण ‘माझ्या हृदयाचे ठोके सामान्य होऊन ‘इको’ चाचणी व्हायला पाहिजे’, या विचाराने मी भाव ठेवून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आळवत आवरण काढत होते, मुद्रा करून नामजप करत होते. दुपारी १२.३० वाजता परिचारिकेने माझ्या हृदयाचे ठोके तपासले, तेव्हा देवाच्या कृपेने माझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती ९० आली. त्यामुळे माझी ‘इको’ चाचणी करता आली. ‘तिचा अहवालही सकारात्मक आला’, हे बघून मला आतून भरून आले.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्यासारख्या सूक्ष्मातून अचूक जाणणार्‍या संतांकडून नामजपादी उपाय मिळत असल्यासाठी कृतज्ञता वाटणे

सद्गुरु गाडगीळकाकांनी मला जी वेळ सांगितली होती, त्या वेळीच माझा त्रास न्यून झाला. त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची ही अफाट क्षमता पाहून मी आश्चर्यचकित झाले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने अशा संतांकडून आम्हा साधकांना होणार्‍या त्रासांवर नामजपादी उपाय मिळत आहेत’, यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आणि सद्गुरु गाडगीळकाकांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’

– सौ. सुषमा नाईक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (२६.३.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक