मातेचा परमोच्च गौरव हिंदु धर्मात केला जात आहे. असे असतांना अन्य धर्मीय हिंदु धर्मियांना स्त्रीद्वेष्टे ठरवतात. त्यांच्यासाठी हिंदु धर्मात वर्णिलेले मातेचे महत्त्व येथे देत आहोत.
व्यास महर्षींनी सांगितलेले मातेचे महत्त्व !
व्यास महर्षी ‘माता’ स्तोत्रात म्हणतात, ‘पुत्राच्या दृष्टीने मातेचे स्थान पित्यापेक्षा श्रेष्ठ आहे; कारण तिने त्याला उदरात धारण केले आहे. त्रैलोक्यात मातेसारखा गुरु नाही. गंगेसारखे तीर्थ नाही. विष्णुसारखा प्रभु नाही. शिवासारखा पूजनीय कुणी नाही. भार्येसारखा मित्र नाही. कन्येसारखे प्रिय नाही, बहिणीसारखे कुणी मान्यवर नाही.’
पित्यापूर्वी मातेला नमस्कार करणे
धर्मज्ञपुत्र माता आणि पिता या दोघांना एकाच वेळी पहातो, त्या वेळी तो मातेला प्रथम नमस्कार करतो आणि नंतर पित्याला नमस्कार करतो.
हिंदु नारीत पवित्रता असल्याने तिला आदरपूर्वक ‘माता’ म्हणत असणे
हिंदु धर्माची निंदा-नालस्ती करणारा ख्रिस्ती पाद्री अँबे ड्युबाय म्हणतो, ‘हिंदु नारीचे शरीर पवित्र असते. कुणीही माणूस तिला बोटानेसुद्धा स्पर्श करू शकत नाही, ती कितीही वाईट परिस्थितीतील असली, तरी मोठमोठे लोक तिला आदरपूर्वक ‘माता’ म्हणून संबोधतात.’
माता कधीच वाईट नसणे
आद्य जगदगुरु शंकराचार्य म्हणतात, ‘कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।’ – श्रीदेव्यापराधक्षमापनस्तोत्र, श्लोक २’ अर्थात् ‘कुपुत्र अगणित झाले, होतील; पण कुमाता झाली नाही आणि व्हायची नाही.’