चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम त्वरित पूर्ण न केल्यास आंदोलन करू ! – सत्यजित पाटील, सरचिटणीस, भाजप

चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेंगाळत ठेवल्याच्या प्रकरणी भाजपची निदर्शने !

चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकर होण्याच्या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली

सांगली, १३ जून (वार्ता.) – येथील चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सांगली येथील काँग्रेस नेत्याच्या नातलगाकडे आहे. रेंगाळलेल्या उड्डाणपुलामुळे स्थानिक भाजप आमदारावर रोष यावा म्हणूनच हे काम रेंगाळत ठेवण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. त्यामुळे मुदतीत हे काम पूर्ण करावे; अन्यथा आम्ही ठेकेदाराविरुद्ध आंदोलन चालू करू, अशी चेतावणी भाजपचे सरचिटणीस सत्यजित पाटील, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी आणि अल्पसंख्यांक मोर्चाचे सरचिटणीस आश्रफ वांकर यांनी ११ जून या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी रेंगाळलेल्या या उड्डाणपुलाच्या कामाची पहाणी केली. या वेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हे काम त्वरित होण्यासाठी उड्डाणपुलाजवळ निदर्शने केली.

धीरज सूर्यवंशी पुढे म्हणाले की, पुलाचे काम ज्या ठेकेदाराकडे आहे, ते ठेकेदार काँग्रेस नेत्याचे नातेवाईक आहेत. या नेत्याच्या सूचनेप्रमाणेच ठेकेदाराकडून काम रेंगाळत ठेवण्यात आले, असा आम्हाला संशय आहे.

सत्यजित पाटील म्हणाले की, ६ महिन्यांत जे काम अपेक्षित होते, ते काम वर्ष झाले, तरी अपूर्ण आहे. सांगलीसह विटा गावापर्यंतच्या सर्व नागरिकांचे या पुलाअभावी हाल होत आहेत. पावसाळ्यात आणखी हाल होणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या मुदतीत जर काम झाले नाही, तर आम्ही आंदोलन करू.

‘पुलाच्या कामात अकारण काही लोक राजकारण आणत आहेत. कोणत्या गोष्टींमुळे काम लांबले, याची माहिती आजवर कधीच या लोकांनी घेतली नाही. रेल्वेचे अधिकारी प्रतिदिन या कामाचा आढावा घेत आहेत. आम्ही जाणीवपूर्वक विलंब केला असता, तर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी ते खपवून घेतले असते का ? राजकारणासाठी असे वेठीस धरणे चुकीचे आहे.’

– रोहन पाटील, कंत्राटदार, चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूल.