‘शालेय शिक्षणासाठी साहाय्य’ या उपक्रमाचे ‘श्री कसबा गणपति विद्यार्थी दत्तक योजने’च्या अंतर्गत यशस्वी आयोजन !

पुणे – पुणे शहराचा मानाचा पहिला श्री कसबा गणपति ! हे मंडळ धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच कार्यात सक्रिय सहभाग नोंदवते. प्रतिवर्षी मंडळाच्या वतीने गरीब मुलांना आर्थिकरित्या दत्तक घेतले जाते. महिलांच्या सबलीकरणासाठी हातभार लावला जातो. किल्लारी भूकंप, भूज भूकंप, तसेच अन्य नैसर्गिक आपत्तींच्या काळात मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला होता. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री कसबा गणपतीच्या वतीने ‘विद्यार्थी दत्तक योजना’ राबवण्यात आली असून ७२ गरजू विद्यार्थ्यांना शाळेचे शुल्क आणि शालेय साहित्य यांचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पी.ई.एस्. सोसायटी, पुणेच्या उपकार्यवाहक डॉ. निवेदिता एकबोटे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी या उपक्रमात साहाय्य केले.

मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष सूरज गाढवे, नीलेश वकील, अनिल पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. विमलाबाई गरवारे, रमणबाग, मॉडर्न मराठी मिडियम, अहिल्यादेवी प्रशाला, महर्षी कर्वे प्रशाला युनिव्हर्सिटी शाखा, आपटे प्रशाळा, दामले प्रशाला, रेणुका स्वरूप अशा एकूण १० शाळा या वेळी सहभागी झाल्या होत्या.

संपादकीय भूमिका

स्थापनेपासूनच या मंडळाने आजवर आपले वेगळेपण कायम जपले आहे. याहीवर्षी हे वेगळेपण जपत कल्याणकारी उपक्रम राबवणार्‍या श्री कसबा गणपति मंडळाचे अभिनंदन !