१३.६.२०२४ या दिवशी राणी लक्ष्मीबाई बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…
ज्येष्ठ शुक्ल सप्तमी (१३.६.२०२४) या दिवशी तेजस्वी रणरागिणी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन (पुण्यतिथी) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सनातनच्या सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सुचलेली ही काव्यसुमनांजली समर्पित करत आहोत.
‘वाराणसीच्या तीर्थस्थानी ।
मोरोपंतांच्या निवासस्थानी ।
वर्ष १८२८ च्या एका शुभदिनी ।
धरावर अवतरली तेजस्वी रणरागिणी ।। १ ।।
मनु वडिलांसह बिठुरला आली ।
पेशवे घराण्याशी एकरूप झाली ।
राजप्रासादात वाढू लागली ।
मनु तात्या टोप्यांची प्रिय शिष्य झाली ।। २ ।।
तलवारबाजीत तरबेज झाली ।
घरकामातही सराईत झाली ।
अभ्यासात कुशल झाली ।
युद्धकलेत निष्णात झाली ।। ३ ।।
मनुबाईची मणिकर्णिका झाली ।
लहानशी छबिली सज्ञान झाली ।
नेवाळकरांशी नाते जुळले ।
मनुबाई झाशी राज्याची राणी झाली ।। ४ ।।
मनुबाई सासरी रमली ।
राज्यकारभारही पाहू लागली ।
मातृत्वाला वंचित झाली ।
अन् लहान वयात विधवा झाली ।। ५ ।।
ही प्रजादक्ष माऊली ।
जणू राजकृपेची साऊली ।
बाजीरावांची लाडकी छबिली ।
राणी लक्ष्मीबाई म्हणून नावाजली ।। ६ ।।
धूर्त इंग्रजांनी डाव मांडला ।
दत्तकपुत्राचा प्रस्ताव फेटाळला ।
राणीने धीर नाही सोडला ।
स्वातंत्र्याचा बाणा नाही मोडला ।। ७ ।।
इंग्रजांविरुद्ध सिंहगर्जना केली ।
‘मेरी झांसी नहीं दूंगी ।’ म्हणाली ।
अन्यायाविरुद्ध पेटून उठली ।
अन् विद्युल्लतेसम कडाडली ।। ८ ।।
स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले ।
इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले ।
झाशीवर इंग्रज चालून गेले ।
संपूर्ण झाशीला त्यांनी वेढले ।। ९ ।।
तळपती तलवार हाती घेऊनी ।
पाठीला बाळाला बांधूनी ।
मध्यरात्री वेढा फोडूनी ।
निघाली रणरागिणी बनूनी ।। १० ।।
काल्पीला चकमक झाली ।
तिने निकराने झुंज दिली ।
राणीने शत्रूला धूळ चारली ।
अन् ग्वाल्हेरला येऊन पोचली ।। ११ ।।
ठायी ठायी रक्त सांडले ।
ग्वाल्हेरही मुक्त केले ।
तिने ऐसे पराक्रम गाजवले ।
इंग्रजही तिच्यापुढे झुकले ।। १२ ।।
वर्ष १८५७ ची क्रांती झाली ।
स्वातंत्र्याची मशाल पेटली ।
मीरत, बरेली आणि देहली ।
यांसह झाशी स्वतंत्र झाली ।। १३ ।।
तिने निकराचा लढा दिला ।
अखेरचा श्वास सोडला ।
प्राणाचाही परित्याग केला
मातृभूमीसाठी देह समर्पित केला ।। १४ ।।
अशी ही झाशीची राणी ।
रणकंद माजवणारी मर्दानी ।
सूर्यासम चमकणारी ।
सिंहासम गर्जना करणारी’ ।। १५ ।।
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.६.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |