अंगात रणरागिणी संचारली पाहिजे ! 

पुष्कळ झाल्या श्रद्धा, साक्षी।
आता तूच उठली पाहिजे।।

कुणी नाही येणार तारायला।
आता तूच लढली पाहिजे।।

स्त्री ही कधीच अबला नाही।
हा आत्मविश्वास जगला पाहिजे।।

सळसळू दे रक्त अन् डोळ्यांत आग।
तुझ्यात विरांगना आली पाहिजे।।

अन्याय होता समोर तुझ्या।
अंगात रणरागिणी संचारली पाहिजे।। १।।

हो तू उठ त्वेषाने अन् कस कंबर।
नराधमांना दाखव जरब।।

न्यायासाठी खोच पदर।
तरच मिळेल नारीला आदर।।

वंशाच्या दिव्याच्या नादात।
नाहक विझल्या पणती।।

त्या पणतीची आता।
मशाल झाली पाहिजे।।

अन्याय होता समोर तुझ्या।
अंगात रणरागिणी संचारली पाहिजे।। २।।

तू सोड तुझा अबलापणा।
या झुगारून सार्‍या रिती।।

आसुसलेल्या वासनांधांवर।
वापरावी दंड-भेदाची नीती।।

या देशाचे भविष्य तुझ्यातच।
त्याच्यासाठी संघर्ष केला पाहिजे।।

मान्य आहे शिवराय जन्मावे घराघरांत।
सोबत झाशीची राणी अवतरली पाहिजे।।

अन्याय होता समोर तुझ्या।
अंगात रणरागिणी संचारली पाहिजे।। ३।।

– कु. संध्या कुरापाटी (वय १९ वर्षे), कुमठा नाका, सोलापूर. (२१.१०.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक