पुणे शहरामध्ये नियमभंग करणार्‍या वाहनचालकांकडून पैसे घेतल्यास पोलिसांवर खंडणीचा गुन्हा नोंद करू !

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची चेतावणी !

अमितेश कुमार

पुणे – यापुढे जर नागरिकांकडून पैसे घेतांना वाहतूक पोलीस आढळून आला, तर त्याच्यावर थेट खंडणीचा गुन्हा नोंद केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. वाहतुकीचे नियम भंग करणार्‍या वाहनचालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून पैसे घेणार्‍या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चेतावणी दिली आहे. (पोलीस आयुक्तांनी धडक कारवाई केल्यासच काही अंशी वाहतूक पोलिसांकडून पैसे घेणे थांबू शकेल. – संपादक)

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यावर अनेक मार्गांनी उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करतांना दिसत आहेत. तरीही वाहतूककोंडी होतांना दिसून येत आहे. या वाहतूक कोंडीला कंटाळून काही दिवसांपूर्वी हिंजवडी भागातील ३७ ‘आयटी’ आस्थापनांनी इतर राज्यांमध्ये स्थानांतर केले आहे. नियमभंग करणार्‍या वाहनचालकांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. तरीही काही वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारे पैसे घेतल्याची चित्रफीत सामाजिक माध्यमांतून प्रसारित होतांना दिसून येतात. या घटनांची गंभीर नोंद घेत पोलीस आयुक्तांनी पोलिसांना चेतावणी दिली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही कर्मचार्‍यांची (पथकांची) नियुक्ती केली आहे. हे पोलीस कर्मचारी साध्या वेशामध्ये वाहनचालक म्हणून शहराच्या विविध भागांमध्ये पहाणी करणार आहेत.