कोल्हापूर – महानगरपालिकेसाठी वितरीत केलेल्या विकास निधीची मुदत संपण्याआधी कामे करा. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना राबवा. अधिक पाऊस झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरल्याच्या अनुषंगाने नालेस्वच्छता योग्यरित्या करा. एकूणच कोल्हापूर शहरातील रस्ते, वाहतूक आणि नालेस्वच्छतेची कामे गतीने करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ जून या दिवशी आयोजित विकासकामांच्या आढावा बैठकीत या सूचना त्यांनी दिल्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि महानगरपालिका विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा ॲकॅडमीची आवश्यकता असून त्यामुळे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सिद्ध होतील. त्यासाठी शेंडा पार्क येथे १० हेक्टर जागा लागणार असून त्याच जागेत क्रीडा विभागाचे कार्यालय प्रस्तावित आहे.’’
या बैठकीत राजाराम बंधारा येथील नवीन पूलाच्या कामाच्या सद्यःस्थितीविषयी आढावा घेण्यात आला. भूसंपादनविषयी नव्याने मोजणी करण्याची प्रक्रिया या आठवड्यात मार्गी लावून त्यानंतर किमान साडेतीन महिने अवधी लागेल. त्यानंतरच प्रत्यक्ष काम चालू करता येईल, असे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले. बांधकाम, उपविभागीय कार्यालय आणि मोजणी कार्यालयास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मार्च २०२५ अखेर सर्व काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.