सातारा, ११ जून (वार्ता.) – महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. त्या दृष्टीने सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाचा महिला सुरक्षा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा प्रकल्प राज्यासाठी निश्चितपणे दिशादर्शक आणि आदर्शवत् ठरेल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला, तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सातारा पोलीस विभाग राबवत असलेल्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. तेव्हा ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यानशी नागराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील मागील ५ वर्षांत महिलांविषयी पोक्सो अंतर्गत ९४६ गुन्हे, बलात्काराचे २४८ गुन्हे, कौटुंबिक हिंसाचाराचे ८६९ गुन्हे, लैंगिक अत्याचाराचे १ सहस्त्र ३९९ गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रकल्प राबवण्यात येत आहे. यामध्ये भरवसा केंद्राची उभारणी करून पोक्सो, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार यामधील पीडितांना साहाय्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पीडितांना वेळेवर साहाय्य देणे, पोलीस, वैद्यकीय, कायदेशीर साहाय्य, तसेच समुपदेशन हे एकाच छताखाली देण्याच्या दृष्टीने भरोसा केंद्र अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश मंत्री देसाई यांनी पोलीस विभागाला दिले. या वेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही महिलांच्या सुरक्षेसाठी भरोसा केंद्र, नियमित गस्त, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग याविषयी माहिती देत उपस्थितांना अवगत केले.