छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील शेंद्रा येथे असलेल्या श्री मांगवीर बाबा देवस्थानास तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देण्यात यावा आणि श्री मांगवीर बाबा देवस्थान विकास प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी ‘लहू प्रहार संघटने’च्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे ७ जून या दिवशी निदर्शने करण्यात आली. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदीश मणियार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात लहू प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष पवार, राज्य कार्याध्यक्ष नितीन आव्हाड यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, श्री मांगवीर बाबा देवस्थान महाराष्ट्रातील मातंग समाजाचे अढळ श्रद्धास्थान आहे. प्रतिवर्षी चैत्र कृष्ण पंचमीला येथे भरणार्या यात्रेत ९ ते १० लाख भाविक येतात; मात्र यात्रेकरूंना कोणत्याही प्रकारची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून पुरवण्यात येत नाही. श्री मांगवीर बाबा देवस्थानास तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देण्यात यावा, मंदिरापर्यंत जाण्यासाठी ३० मीटरचे समांतर २ रस्ते सिद्ध करण्यात यावे, शेंद्रा येथील श्री गणपति इनाम श्री मांगवीर बाबा देवस्थान वर्ग करावा, प्रतिवर्षी चैत्र कृष्ण पंचमीला भरणार्या श्री मांगवीर बाबा यात्रेसाठी २५ एकर भूमी उपलब्ध करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.