पुणे येथील ३५० वा ‘हिंदु साम्राज्य दिन’ साजरा !
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज हे एकमात्र राजा होते, ज्यांना ‘श्रीमान योगी’ म्हटले जाते. त्यांची साधना देशभक्तीची होती, तर मातृभूमीची भक्ती त्यांनी केली. कर्मशील, विवेक, चारित्र्य अशा अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्यामध्ये आढळतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांनी केले. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके तरुण मंडळ यांच्या वतीने ५० वर्षांपूर्वी ३०० वा हिंदु साम्राज्य दिन शनिपार चौकात साजरा करण्यात आला होता, या उपक्रमास ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त ३५० वा ‘हिंदु साम्राज्य’ दिन साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित व्याख्यानात भय्याजी जोशी बोलत होते. या वेळी प्रमुख वक्ते नीलेश भिसे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश असलेकर, विनायक गोखले, प्रसाद भावे आदी उपस्थित होते.
शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून इस्लामी सत्तेचे अस्तित्व छत्रपती शिवाजी महाराजांनी झुगारून लावले ! – नीलेश भिसे, प्रमुख वक्ते
श्री. नीलेश भिसे म्हणाले, ‘‘भगवा झेंडा हा हिंदवी स्वराज्याचा झेंडा आहे. यामध्ये कोणतीही तडजोड छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली नाही. भारतीय इतिहासातील सोनेरी क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक ! शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून इस्लामी सत्तेचे अस्तित्व छत्रपती शिवाजी महाराजांनी झुगारून लावले. संपूर्ण भारतात हिंदुत्व म्हणून कुणी प्रेरणा देत असतील, तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत.’’