तस्करांनी भारतातील मंदिरातून चोरली होती मूर्ती !
लंडन – ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापिठाने घोषित केले आहे की, ते दक्षिण भारतातील तमिळ कवी संत तिरुमनकाई अलवर यांची ५०० वर्षे जुनी मूर्ती भारताला परत करणार आहेत. या मूर्तीची उंची ६० सें.मी. असून ती कांस्याची आहे. सध्या ही मूर्ती ऑक्फफोर्ड विद्यापिठाच्या अश्मोलियन संग्रहालयात आहे.
१. संत तिरुमनकाई अलवार यांची १६ व्या शतकातील मूर्ती परत करण्याचा दावा ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या वतीने करण्यात आला होता. तस्करांनी ही मूर्ती भारतीय मंदिरातून चोरली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
२. ११ मार्च २०२४ या दिवशी ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या ‘कौन्सिल’ने अश्मोलियन संग्रहालयातून संत तिरुमनकाई अलवर यांची १६ व्या शतकातील कांस्य मूर्ती परत करण्याच्या भारतीय उच्चायुक्तांच्या दाव्याचे समर्थन केले होते.
कोहिनूर हिराही परत करण्याची भारताची मागणी !
वर्ष १८४९ मधील दुसर्या अँग्लो-शीख युद्धातील विजयानंतर उत्तर भारतातील पंजाबमधील कोहिनूर हिरा ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने चोरला होता. हा हिरा राणी व्हिक्टोरिया यांना देण्यात आला होता आणि तेव्हापासून तो लंडनच्या टॉवरमधील ‘ज्वेल हाऊस’मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. भारत या हिर्याचा खरा मालक असल्याचे अनेक दावे भारत सरकारने केले आहेत. वर्ष १९४७ मध्ये ब्रिटीश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोहिनूर हिरा परत करण्याची मागणी भारताने वेळोवेळी केली आहे. इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सरकारांनीही या हिर्याच्या मालकीचा दावा केला आहे.